टीम AM : जनतेच्या प्रश्नांबाबत प्रशासकीय अधिकारी सकारात्मक असेल तर निश्चित त्या प्रश्नांना सोडविण्यासाठी मदतच होते. सध्या याचा प्रत्यय अंबाजोगाई नगरपरिषदेत येत आहे. मुख्याधिकारी पदाचा कार्यभार हाती घेतल्यापासून प्रियांका टोंगे या सातत्याने जनतेचे प्रश्न जाणून घेऊन ते तातडीने सोडविण्यासाठी प्रयत्न करताना दिसून येत आहेत. लालनगर तसेच अंबाजोगाईतील स्मशानभूमींची दुरावस्था याबबत ‘अंबाजोगाई मिरर’ ने वृत प्रकाशित केले होते. याचाच आधार घेत नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी प्रियांका टोंगे यांनी आज रखरखत्या उन्हात लालनगर स्मशानभूमीला भेट देत त्या ठिकाणी असणाऱ्या समस्यांची पाहणी केली. यावेळी स्वच्छता निरीक्षक अनंत वेडे, संपादक महादेव गोरे, सामाजिक कार्यकर्ते विश्वजित शिंदे यांची उपस्थिती होती.
तातडीने समस्या सोडविण्याच्या सूचना
लालनगर स्मशानभूमीच्या समस्या मुख्याधिकारी प्रियांका टोंगे यांनी जाणून घेतल्या आणि त्या तातडीने सोडविण्यासाठी सूचना केल्या. परिसरातील स्वच्छता तसेच स्मशानभूमीच्या शेडच्या डागडुजीचे काम तातडीने हाती घेऊन ते पुर्ण केले जाईल, असे आश्वासन दिले. तसेच विद्युत पुरवठा सातत्याने चालू राहिल याची दक्षता घेतली जाईल, असे आश्वासन प्रियांका टोंगे यांनी यावेळी दिले.
‘डिपीडिसी’ च्या निधीतून संरक्षण भिंती
पुढे बोलताना टोंगे यांनी सांगितले की, स्मशानभूमींना संरक्षण भिंती नाहीत. त्यावरही आपण लवकरच मार्ग काढू. ‘डिपीडिसी’ च्या निधीतून संरक्षण भिंती बांधण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन देखील प्रियांका टोंगे यांनी यावेळी दिले. मुख्याधिकारी प्रियांका टोंगे यांनी स्मशानभूमीला भेट देऊन पाहणी केल्यामुळे स्मशानभूमींच्या समस्या लवकरच दूर होतील, अशी अपेक्षा करण्यात येत आहे.