टीम AM : नागपूर ते गोवा ‘शक्तिपीठ’ महामार्गाला बीड जिल्ह्यात शेतकऱ्यांचा विरोध होताना दिसून येत आहे. परळी व अंबाजोगाई तालुक्यातून ‘शक्तिपीठ’ महामार्ग जाणार असून या दोन्ही तालुक्यांतील शेतकऱ्यांनी आक्रमक होत महामार्गाच्या सीमांकनास तीव्र विरोध केल्याने सोमवारी मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांवर मोजणी सोडून परत जाण्याची नामुष्की आली.
बीड जिल्ह्यातील परळी, अंबाजोगाई तालुक्यातील ज्या गावांतून ‘शक्तिपीठ’ महामार्ग प्रस्तावित आहे, त्या अनेक गावांमध्ये सीमांकनासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांच्या रोषाचा सामना करावा लागला. अंबाजोगाई तालुक्यातील वरवटी, सायगाव, पिंपळा धायगुडा, भारज, गित्ता या गावांत सोमवारी शेतकऱ्यांनी एकत्र येत मोजणीसाठी आलेल्या अधिकाऱ्यांना विरोध केला. कोणत्याही परिस्थितीत आपल्या जमिनी या महामार्गाला न देण्याची भूमिका महिला व पुरुष शेतकऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे सीमांकन होऊ शकले नाही.
शेतकऱ्यांसोबत लढणार
‘शक्तिपीठ’ महामार्गप्रकरणी किसान सभा सुरुवातीपासून विरोध करत आहे. परळी, अंबाजोगाई येथील अनेक गावांत या महामार्गाच्या सीमांकनास शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केला असून ‘शक्तिपीठ’ महामार्गाविरोधात किसान सभा शेतकऱ्यांसोबत लढत कायम विरोध करणार आहे. – ॲड. अजय बुरांडे, किसान सभा.