टीम AM : राज्याच्या विविध भागात उष्णतेची तीव्रता वाढत असून उष्माघाताच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागानं नागरिकांना खबरदारीचा इशारा दिला आहे. आरोग्य विभागानं सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये उष्णतेशी संबंधित समस्यांवर उपचार करण्यासाठी विशेष कक्ष सुरू केले आहेत.
सर्व जिल्हा आणि महापालिका स्तरांवरील साथरोग वैद्यकीय अधिकाऱ्यांना उष्माघात विषयक प्रशिक्षण देण्यात आलं आहे. राज्यात 21 मार्चपर्यंत उष्माघाताचे 21 रुग्ण आढळून आले आहेत.
काय करावे अन् काय टाळावे…
लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. दुपारी बारा ते तीन या कालावधीत बाहेर उन्हात जाण्याचे टाळावे. गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे. बाहेर तापमान जास्त असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळावीत. मोकळ्या हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडक्या उघडी ठेवावीत. शरीरात पाण्याचे प्रमाण कमी करण्यास कारणीभूत असलेले चहा, कॉफी, मद्य व कार्बोनेटेड थंड पेय यांचा वापर टाळावा. शिळे अन्न खाऊ नये आणि उच्च प्रथिने असलेले अन्न टाळावे.