अंबाजोगाईतील बौद्ध लेणी दुर्लक्षित : बौद्ध अनुयायांत संतापाची लाट

जतन, संवर्धन करण्याची होतेय मागणी

टीम AM : अंबाजोगाई शहरात एक धक्कादायक बाब समोर आली आहे. शहरातील आद्यकवी मुकुंदराज यांच्या समाधीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या बौद्ध लेणी दुर्लक्षित राहिल्या आहेत. या लेण्यांकडे अंबाजोगाई तालुका प्रशासनाने, पुरातत्त्व विभागाने आणि लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याने बौद्ध अनुयायांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. या बौद्ध लेण्यांचं जतन आणि संवर्धन करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. 

महाराष्ट्रात अगणित ठिकाणी बौद्ध लेणी असल्याचं आढळून येतं. बौध्द लेणी ही महाराष्ट्राचाच नाहीतर भारत आणि जगाचा अपूर्व असा ठेवा आहे. या  आपल्या भारतीयांच्या वैभवशाली परंपरेच्या खुणा आहेत आणि ही वैभवशाली परंपरा टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. परंतू, हत्तीखाना परिसरालगत असणाऱ्या या बौद्ध लेण्या दुर्लक्षित ठेवण्याचं काम गेल्या कित्येक वर्षांपासून सातत्याने सुरू आहे. 

हत्तीखाना परिसरात असणाऱ्या बौद्ध लेण्यांची तोडफोड करण्यात आली आहे. या बौद्ध लेण्यांमध्ये जवळपास 32 बुध्दांच्या मुर्ती होत्या. त्या मुर्तींची तोडफोड झाली असून अजूनही त्या ठिकाणी जवळपास 8 मुर्ती आणि काही ठिकाणी कोरीव केलेले काम स्पष्टपणे दिसून येते. त्यासोबतच काही हत्तींचे शिल्प देखील या लेण्यामध्ये आपणास पहावयास मिळतात. याचीही तोडफोड झाली असल्याचे या ठिकाणी निदर्शनास येते. या लेण्या अंबाजोगाईचा अनमोल ठेवा आहे. या लेण्यांचं उत्खनन करून आणखी काही त्या ठिकाणी सापडते का ? याचा शोध घेणे गरजेचे आहे. त्यामुळे अंबाजोगाई तालुका प्रशासनाने, पुरातत्त्व विभागाने आणि लोकप्रतिनिधींनी यासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे. या बौद्ध लेण्या संरक्षित करुन त्यांचं जतन आणि संवर्धन करणे गरजेचे आहे, अशी मागणी बौद्ध अनुयायांच्या वतीने करण्यात येत आहे.