टीम AM : माणसाचं मन हा एक असा अथांग जुगारखाना आहे, जिथे रोज आशेचे फासे टाकले जातात आणि रोजच पदरात निराशेची सोंगटी पडते. तरीही, दुसऱ्या दिवशीच्या एका अंधुक उजेडासाठी माणूस पुन्हा नव्याने डावावर स्वतःचं सर्वस्व पणाला लावतो. ॲमेझॉन प्राईमवर आलेली नागराज मंजुळे दिग्दर्शित ‘मटका किंग’ (Matka King) ही वेब सीरिज केवळ 1960 च्या दशकातल्या मुंबईची किंवा एका बेकायदेशीर धंद्याची गोष्ट सांगत नाही; ती गोष्ट सांगते माणसाच्या आतल्या न संपणाऱ्या लालसेची, महत्त्वाकांक्षेच्या मृगजळामागे धावणाऱ्या त्याच्या अगतिकतेची आणि यशाच्या शिखरावर पोहोचल्यावर वाट्याला येणाऱ्या गोठवून टाकणाऱ्या एकाकीपणाची.
आयुष्य म्हणजे तरी दुसरं काय असतं ? आशेच्या एका तलम धाग्याला धरून नियतीच्या अंधाऱ्या कुपीतून आपणही रोज एक ‘आकडा’ बाहेर काढत असतोच ना! ‘मटका किंग’चा नायक ब्रिज भट्टी नेमकं हेच मानवी मानसशास्त्र ओळखतो. गरिबीच्या चटक्यांनी होरपळलेला सामान्य माणूस जेव्हा मटक्यात पैसा लावतो, तेव्हा तो केवळ ‘पैसा’ जिंकण्यासाठी खेळत नसतो; तो उद्याचा ‘उजेड’ विकत घेण्याची धडपड करत असतो.
हा खेळ पैशांचा नाहीच मुळी, हा खेळ आहे मानवी असहायतेचा. मटका म्हणजे आशेचं एक असं अफूचं रसायन आहे, जे माणसाला वास्तवाचे चटके विसरायला लावतं. पण या आभासी विश्वाचा राजा होताना नायक स्वतःच्याच आत कसा हरवत जातो, याचा अत्यंत अस्वस्थ करणारा मानसिक प्रवास या सीरिजमध्ये उलगडत जातो. एक प्रामाणिक माणूस जेव्हा अप्रामाणिक जगाचा देव बनू पाहतो, तेव्हा त्याची होणारी मानसिक तडफड आपल्याला मुळापासून हादरवून टाकते.
या सीरिजमधली पात्रं म्हणजे जणू नियतीच्या पटावरील अस्वस्थ सोंगट्याच आहेत. प्रत्येक कलाकारानं या व्यक्तिरेखांच्या आतला कोलाहल अत्यंत संयतपणे पडद्यावर जिवंत केला आहे. विजय वर्माने साकारलेला ‘मटका किंग’ डोळ्यांत पाणी आणतो. सगळं जग जिंकल्यावरही स्वतःच्याच माणसांपासून दुरावत जाणाऱ्या एका महत्त्वाकांक्षी माणसाची घुसमट त्याने ज्या ताकदीने साकारली आहे, ती शब्दातीत आहे.
यशाच्या आणि पैशाच्या आगीत नात्यांची ओल कशी आटत जाते, याचं विदारक चित्र म्हणजे सई ताम्हणकरची ‘बरखा’. सत्तेच्या सारीपाटावरील एक अत्यंत चतुर, तरीही कुठेतरी स्वतःच्या रिकाम्या अस्तित्वाचा शोध घेणारी मटका क्वीन क्रितिकाने अतिशय प्रभावीपणे रंगवली आहे. एका निष्ठावान पण परिस्थितीच्या चक्रव्युहात अडकलेल्या आणि भूतकाळाचे ओझे वाहणाऱ्या सैनिकाची अगतिकता सिद्धार्थ जाधवने ज्या ताकदीने मांडली आहे, ती थक्क करणारी आहे.जुन्या व्यवस्थेचा आणि सत्तेचा क्रूर चेहरा गुलशन ग्रोवर यांनी त्यांच्या खास शैलीत उभा केला आहे. गिरीश कुलकर्णी आणि किशोर कदम यांनी समाजाची सद्सद्विवेकबुद्धी, भ्रष्ट व्यवस्था आणि राजकारण यांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या या दिग्गजांनी या काळ्या-पांढऱ्या जगाला आपल्या अभिनयाने एक गडद राखाडी रंग दिला आहे.
नागराज मंजुळे हे केवळ कथा सांगत नाहीत, तर ते मानवी वृत्तीचे एक क्रूर पण सत्य दर्शन घडवतात. झोपडपट्टीतल्या एका मजुरापासून ते मोठ्या साहेबांपर्यंत सगळ्यांना एकाच व्यसनाच्या रेषेत आणणारा हा ‘मटका’ कसा सगळ्यांचाच बळी घेतो, हे पाहताना अंगावर काटा येतो. दिग्दर्शकाने या मटक्याच्या बहाण्याने माणसाच्या आतल्या अंधाराचा तळ गाठला आहे.
‘मटका किंग’ पाहताना एक गोष्ट तीव्रतेने जाणवते… मटक्यातून निघणारी चिठ्ठी हा केवळ आकडा नसतो, तो माणसाच्या नशिबाचा, त्याच्या कर्माचा आणि त्याने घेतलेल्या निर्णयांचा हिशेब असतो. ही सीरिज पाहताना आपण फक्त एका ‘किंग’ची गोष्ट पाहत नाही, तर आपण आपल्याच आतल्या लालसेच्या आरशात पाहत असतो. तो आरशातला चेहरा आपल्याला शेवटी एकच प्रश्न विचारतो, “आयुष्याच्या या धावपळीत, या रोजच्या जुगारात आपण काय गमावलं आणि काय मिळवलं ?” सगळं जग मुठीत आल्याचा भास होतो, पण मुठ उघडल्यावर हाती उरते ती फक्त वाळू. ‘मटका किंग’ ही केवळ पैशांची गोष्ट उरत नाही; ती गोष्ट बनते एका अशा प्रवासाची, जिथे माणूस स्वतःला हरवून जग जिंकायला निघतो… आणि शेवटी उरतो तो फक्त एक रिकामा ‘मटका’ आणि त्यात घुमणारा अस्तित्वाचा पोकळ, सुन्न करणारा आवाज ! ही सीरिज संपते, पण मनात उठलेले हे अस्वस्थ प्रश्न आणि डोळ्यांच्या कडांवर रेंगाळणारा एक अश्रू मात्र खूप काळ सोबत राहतो.
लेखक : कृष्णा सपाटे



