टीम AM : मराठी भाषा गौरव दिन आज साजरा होत आहे. कविवर्य वि. वा. शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांनी मराठी साहित्यविश्वात दिलेल्या योगदानाप्रती कृतज्ञता म्हणून, २७ फेब्रुवारी हा त्यांचा जन्मदिवस, ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्यात येतो. यानिमित्तानं राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कुसुमाग्रजांना अभिवादन केलं असून, राज्यातल्या जनतेला मराठी भाषा गौरव दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. ‘मायमराठी जपा, सन्मान करा, संस्कृतीचं संवर्धन करा’, असं त्यांनी सामाजिक माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त नाशिकच्या शिरवाडे वणी इथं ‘कवितेचे गाव’ साकार होत असल्याची माहिती, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दिली. याठिकाणी कुसुमाग्रजांचं साहित्य, कविता आणि अन्य थोर साहित्यिकांचं लेखन संग्रहित केलं जाणार आहे.