सोयाबीन खरेदीला एक महिन्यापर्यंत मुदतवाढ द्यावी : राजेसाहेब देशमुख

दर घसरल्याने शेतकऱ्यांत नाराजी : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची फरपट थांबवा

टीम AM : सोयाबीन खरेदीसाठी आणखी काही दिवस मुदतवाढ मिळणे आवश्यक आहे. कारण, अद्यापही 50 टक्क्यांहून अधिक सोयाबीन शेतकऱ्यांकडे शिल्लक आहे. खाजगी व्यापाऱ्यांकडे भाव नाही व शासकीय खरेदी केंद्राकडे अनेक ठिकाणी बारदाना नाही. यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन खरेदी केंद्रांवर आणले नव्हते. तशातच मुदतवाढ संपणार असल्याने मागील दहा ते पंधरा दिवसांपासून सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी आपले सोयाबीन किरायाच्या वाहनातून खरेदी केंद्रांवर आणले आहे. 

सोयाबीनने भरलेल्या वाहनांच्या रांगा खरेदी केंद्रांसमोर दिसून येत आहेत. सोयाबीनचे दर घसरल्याने शेतकरी वर्गात नाराजी आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची फरपट थांबवा आणि सोयाबीन खरेदीला एक महिन्यापर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राजेसाहेब देशमुख यांनी केंद्र व राज्य सरकारकडे केली आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारचे पणन मंत्री  जयकुमार रावल यांनी केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे नव्याने मुदतवाढीचा प्रस्ताव पाठवावा, अशी अपेक्षाही देशमुख यांनी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने केली आहे.