टीम AM : बीड जिल्ह्यातल्या विघनवाडी ते बीड या रेल्वेमार्गाची जलदगती चाचणी आज पार पडली. आज सकाळी विघनवाडी ते नवगण राजुरी रेल्वे चाचणीची खासदार बजरंग सोनवणे, आमदार संदीप क्षीरसागर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी पालवण इथं पाहणी केली.
अहिल्यानगर ते बीड या 261 किलोमीटर अंतराच्या रेल्वेसाठी बीडवासियांचा गेल्या तीन दशकापासून संघर्ष सुरू असून, अमळनेरपर्यंतचा रेल्वेमार्ग तयार झाल्यानंतर काही काळ हे काम थांबलं होतं, मात्र, आता बीड जिल्ह्याची या रेल्वेमार्गाची प्रतिक्षा पूर्ण झाल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.
अंबाजोगाई – घाटनांदूर रेल्वे मार्ग कधी होणार ?
अंबाजोगाईला रेल्वे मार्ग व्हावा, यासाठी येथील जनता पन्नास वर्षांपासून मागणी करीत आहे. केंद्र सरकारकडे पाठपुरावा करीत आहे. येथील दोन लोकप्रतिनिधी केंद्रीय मंत्री झाले. परंतू, त्यांनी अंबाजोगाई रेल्वे मार्गाकडे दुर्लक्ष केले. सामाजिक कार्यकर्ते भारत पसारकर यांनी अनेकवेळा केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना नागरिकांच्या स्वाक्षरीचे निवेदने पाठविली, हजारों पोस्टकार्ड पाठविली, पाठपुरावा केला. परंतू, अद्याप अंबाजोगाईकरांचे रेल्वेचे स्वप्न पूर्ण झाले नाही. अजूनही अंबाजोगाईकर रेल्वेच्या प्रतिक्षेत असून अंबाजोगाई – घाटनांदूर रेल्वे मार्ग कधी होणार ? असा प्रश्न लोकप्रतिनिधींना विचारत आहेत.