टीम AM : बीड जिल्ह्यात आज रविवारी सकाळी एक दु:खद घटना समोर आली आहे. पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवकांना एसटी बसने चिरडले आहे. या अपघातात तीन युवकांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा भीषण अपघात बीड तालुक्यातील राजूरी येथे घडला आहे. या अपघाताच्या घटनेनंतर सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
या बाबत प्राप्त माहिती अशी की, बीड तालुक्यातील राजूरी या गावातील युवक पोलीस भरतीची तयारी करीत होते. आज दिनांक 19 जानेवारी रविवार रोजी पहाटे नेहमीप्रमाणे सदरील युवक गावालगत असणाऱ्या रस्त्याच्या कडेला पोलीस भरतीची तयारी करीत असताना एसटी बसने युवकांना जोराची धडक देत चिरडले. या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यु झाला तर त्यांच्यासोबत असणाऱ्या दोघांनी रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात उडी मारून जीव वाचवला. अपघातात मृत्यू पावलेल्या युवकांची नावं बोध (बालू) बाबासाहेब मोरे [वय 20], विराट बभ्रुवाहन घोडके [वय 19], ओम सुग्रीव घोडके [वय 20] अशी आहेत. या घटनेमुळे राजूरी गावावर शोककळा पसरली आहे.



