‘आएएस’ होण्यासाठी दिला ‘आयपीएस’ पदाचा राजीनामा : अर्पिता ठुबे यांची नेत्रदीपक भरारी, वाचा… 

टीम AM : ‘युपीएससी’ ची परीक्षा ही देशातली सगळ्यात कठीण मानली जाते. दरवर्षी हजारो विद्यार्थी ही परीक्षा देत असतात. पण या विद्यार्थ्यांपैकी काही जणांनाच या परीक्षेत यश मिळतं. मात्र, अपयश पदरात पडूनही काही विद्यार्थी हार मानत नाहीत. ते अधिक जोमाने तयारी करायला लागतात आणि यश मिळवतात. अर्पिता ठुबे यांच्या बाबतीत असंच काहीसं घडलं आहे. अर्पिता ठुबे या सध्या अंबाजोगाई नगरपरिषदेच्या प्रशिक्षणार्थी मुख्याधिकारी आहेत. मुख्याधिकारी पदाचा पदभार हाती घेतल्यापासून अर्पिता ठुबे यांनी कामाचा सपाटा लावला आहे. बोगस नळ कनेक्शन असो की अतिक्रमणे यावर त्यांनी कारवाई सुरु केली आहे. तसेच शहरातील बॅनरबाजीला देखील त्यांनी लगाम लावला आहे. दिनांक 24 डिसेंबरपासून रुजू झालेल्या ‘आएएस’ अर्पिता ठुबे यांनी आपल्या कार्याची चुणूक दाखवीत नगरपरिषद प्रशासनात सुसूत्रता आणली आहे. परंतू, आपल्याला हे माहीत आहे का ? अर्पिता ठुबे या दोनदा ‘युपीएससी’ परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत. जाणून घ्या त्यांची कारकीर्द… 

अर्पिता ठुबे ‘युपीएससी’ ची परीक्षा पास झाल्या. त्या ‘आयपीएस’ बनल्या. पण त्यांनी त्या पदाचा राजीनामा दिला आणि पुन्हा ‘युपीएससी’ ची परीक्षा दिली. अर्पिता ठुबे या लहानपणापासूनच हुशार होत्या. त्यांनी बारावीची परीक्षा पास केल्यावर सरदार पटेल कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमधून इंजिनीअरिंगची पदवी घेतली. त्यानंतर देशाची सेवा करण्यासाठी त्यांनी ‘युपीएससी’ ची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला.

‘आयएएस’ ऑफिसर बनण्यासाठी सोडलं ‘आयपीएस’ मधलं पद

अर्पिता यांनी 2019 ला ‘युपीएससी’ ची सिव्हिल परीक्षा दिली. पण त्यांना त्यावेळी यश मिळाले नाही. त्या पूर्वपरी नापास झाल्या. पण तरीही त्यांनी हार मानली नाही. त्यांनी पुन्हा परीक्षेची तयारी केली आणि 2020 साली पुन्हा ‘युपीएससी’ सीएसई परीक्षा दिली. त्यांना यावेळी 383 वी रैंकिंग मिळाली. त्यांनी इंडियन पोलीस सर्व्हिस (आयपीएस) मध्ये स्थान मिळवलं . खरंतर ‘आयपीएस’ चं पदही अर्पिता यांच्यासाठी मोठी संधी होती. पण त्यांना (आएएस) ऑफिसरची इच्छा होती. त्यामुळे पुन्हा 2021 ला त्यांनी ‘युपीएससी’ ची परीक्षा दिली. पण नोकरीमुळे त्यांना अभ्यासासाठी पुरेसा वेळ देता येत नव्हता. त्यामुळे त्यांनी ‘आयपीएस’ च्या पदाचा राजीनामा दिला.

चौथ्या प्रयत्नानंतर मिळाले यश

अर्पिता यांनी पुन्हा एकदा दिवस रात्र ‘युपीएससी’ चा अभ्यास करायला सुरुवात केली. त्यांनी 2022 ला चौथ्यांदा ‘युपीएससी’ ची परीक्षा दिली. या परीक्षेत त्यांना यश मिळालं. अर्पिता ‘युपीएससी’ च्या विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श आहेत. अनेकदा तरुण – तरुणी अपयश आल्यानंतर हार मानतात आणि प्रयत्न करणं सोडून देतात. पण कायम प्रयत्न करत राहिलं आणि एखादं ध्येय साध्य करण्याची संपूर्ण तयारी असेल तर यश मिळते, हे विद्यार्थ्यांनी अर्पिता यांच्याकडून शिकायला हवं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here