टीम AM : राज्यात थंडीचा जोर वाढू लागला आहे. अंबाजोगाई शहरासह आसपासच्या परिसरातही थंडीची लाट दिसून येत आहे. सकाळच्या सुमारास दाट धुक्याची चादर परिसरातील डोंगरांवर आणि शेत शिवारांवर पसरत आहे. दिवसभर काहीसे उन्हे जाणवल्यावर पुन्हा सायंकाळच्या सुमारास वातावरणात कमालीचा गारवा जाणवत आहे. कामगार, दुग्ध विक्रेते, शाळकरी विद्यार्थी, शेतमजूर यांना या थंडीचा सर्वाधिक सामना करावा लागत आहे.
राज्याच्या अनेक भागात थंडीचा कडाका वाढत आहे. आज राज्यात जळगाव इथं सर्वात कमी 10 पूर्णांक 8 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. त्याखालोखाल महाबळेश्वर इथं 13 अंश तर नाशिक तसंच अमरावती इथं साडेतेरा अंश तापमान नोंदवलं गेलं. मराठवाड्यात बीड इथंही साडे 13 अंश, छत्रपती संभाजीनगर इथं 14 पूर्णांक 2 अंश, तर परभणी इथं 14 पूर्णांक 4 अंश तापमानाची नोंद झाली. राज्याच्या इतर भागातही तापमानात मोठी घट झाल्याचं हवामान विभागाच्या आजच्या अहवालातून दिसून येत आहे.
पश्चिम महाराष्ट्रासह, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही थंडीत वाढ झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवस तापमान आणखी कमी होण्याची शक्यता आहे.



