योगेश्वरी मंदिर तीर्थक्षेत्राचा प्रश्न रखडला : लोकप्रतिनिधींच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह, वाचा…!

टीम AM : अंबाजोगाई येथील योगेश्वरी देवीच्या मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने होत असतानाही हा प्रश्न अद्याप प्रलंबितच राहिला आहे. राज्यातील इतर तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी मोठे निधी जाहीर होत असताना योगेश्वरी देवी मंदिराच्या तीर्थक्षेत्र दर्जाचा मुद्दा मात्र पुढे सरकत नसल्याची चर्चा सुरू आहे. यामुळे स्थानिक लोकप्रतिनिधींच्या कामगिरीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

अंबाजोगाई शहरातील प्राचीन व ऐतिहासिक असलेल्या योगेश्वरी देवीच्या मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याची मागणी पुन्हा एकदा जोर धरू लागली आहे. अंबाजोगाई शहराचं ग्रामदैवत असलेल्या योगेश्वरी देवीचे मंदिर हे केवळ धार्मिकच नव्हे तर सांस्कृतिक आणि ऐतिहासिक दृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. कोकणातील अनेक कुटुंबांचे कुलदैवत म्हणूनही योगेश्वरी देवीची ओळख असून, वर्षभर राज्याच्या विविध भागातून तसेच कोकण पट्ट्यातून हजारो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात.

विशेषतः नवरात्रोत्सव, यात्रा आणि इतर धार्मिक उत्सवांच्या काळात मंदिर परिसरात मोठी गर्दी होत असते. मात्र, वाढत्या भाविकसंख्येच्या तुलनेत आवश्यक सुविधा, पायाभूत विकास आणि नियोजनबद्ध तीर्थक्षेत्र विकासाची गरज असल्याचे स्थानिक नागरिक व भाविकांचे मत आहे. त्यामुळे योगेश्वरी देवी मंदिराचा तीर्थक्षेत्र विकास योजनेत समावेश करून त्यासाठी स्वतंत्र निधी मंजूर करावा, अशी मागणी अंबाजोगाईकरांकडून सातत्याने केली जात आहे.

स्थानिकांच्या मते, अंबाजोगाई हे ऐतिहासिक व धार्मिक वारसा लाभलेले शहर असूनही येथे मोठ्या प्रमाणावर पर्यटन विकासासाठी अपेक्षित पावले उचलली गेली नाहीत. योगेश्वरी देवी मंदिराला तीर्थक्षेत्राचा अधिकृत दर्जा मिळाल्यास मंदिर परिसराचा विकास, भाविकांसाठी सुविधा, पर्यटनवाढ आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला मोठा हातभार लागू शकतो.

दरम्यान, अंबाजोगाईतील योगेश्वरी देवी मंदिराला तीर्थक्षेत्र विकासाचा दर्जा मिळवून देण्यात येथील सत्ताधारी लोकप्रतिनिधींना अद्याप यश आलेले नसल्याची भावना अंबाजोगाईकर व्यक्त करत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन योगेश्वरी देवी मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा जाहीर करावा, अशी अपेक्षा आता अंबाजोगाईकरांकडून व्यक्त होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here