टीम AM : ‘एचएमपीव्ही’ संसर्गाबाबत घाबरण्याचं कारण नाही, मात्र खबरदारी घेण्याचं आवाहन राज्य शासनानं केलं आहे. राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर तसंच वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी काल पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. गेल्या वर्षभरात देशात या आजाराचे काही रुग्ण आढळले होते, ते सर्व रुग्ण रुग्णालयात दाखल न होताच बरे झाल्याची माहिती आबिटकर यांनी दिली.
आबिटकर म्हणाले, ‘आयसीएमआर’ नं ज्या वेळेला भारतामध्ये फेब्रुवारी 2024 ते डिसेंबर 2024 मध्ये संभाव्य ‘एचएनपीव्ही’ च्या विषाणूची आठ हजार बावन नमुन्यांच्या चाचण्या केल्या होत्या. या सगळ्या चाचण्यांच्यामध्ये एकूण 172 पॉझिटीव्ह अशा पद्धतीच्या चाचण्या निघाल्या आहेत. फेब्रुवारी 2024 ते डिसेंबर 2024 मध्ये ही सर्व प्रकरणं सौम्य होती. आणि त्याप्रमाणे या कुठल्याही पेशंटला ॲडमिट न करता सुद्धा यातला कुठलाही पेशंट न दगावता सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं ते बरे झालेत.
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी बोलतांना, राज्यात आतापर्यंत या संसर्गाचा एकही रुग्ण आढळलेला नाही, असं स्पष्ट केलं. तरीही सर्व वैद्यकीय महाविद्यालयांनी औषधांसह ऑक्सिजन आणि आवश्यकता वाटल्यास विलगीकरण व्यवस्थेच्या तयारीत राहावं, आणि वैद्यकीय महाविद्यालयांचे अधिकारी तसंच कर्मचाऱ्यांच्या रजा रद्द कराव्यात, अशा सूचना मुश्रीफ यांनी दिल्या आहेत.