खो – खो विश्वचषक स्पर्धा :  केजची प्रियंका इंगळे करणार नेतृत्व, वाचा… 

टीम AM : महिलांच्या खो – खो विश्वचषक स्पर्धेला उद्यापासून दिल्लीत प्रारंभ होत आहे. या स्पर्धेत सहभागी भारतीय संघाच्या कर्णधारपदी बीड जिल्ह्याच्या केज तालुक्यातल्या कळंब आंबा इथल्या प्रियंका इंगळेची निवड झाली आहे. या निवडीबद्दल तिचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे. 

प्रियंकाचे वडील हनुमंत इंगळे यांनीही आनंद व्यक्त केला आहे. हनुमंत इंगळे यांनी बोलताना सांगितले की, तिला वर्ल्डकपसाठी संधी मिळाली, ही आनंददायी गोष्ट आहे. ती भारतीय संघाचे नेतृत्व करणार असल्याने वडील या नात्याने मी भरपूर आनंदात आणि खूश आहे. दरम्यान, प्रियंका इंगळेची कर्णधारपदी निवड होताच तिला समाजमाध्यमांवर अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. 

विश्वचषक स्पर्धेत जगभरातील चोवीस देशांचे खो – खो संघ सहभागी होत आहेत. कर्णधारपद प्रियंका इंगळे हिला मिळाले आहे. तिच्या या संघात आश्‍विनी शिंदे, रेश्मा राठोड, भिलार देवजीभाई, निरमला भाटी, निता देवी, चैत्रा आर, सुभाश्री सिंग, मगाई माजी, अंशु कुमारी, वैष्णवी बजरंग, मसरीन शेख, मिनू, मोनिका व नाझिया या खेळाडूंचा भारतीय खो – खो संघात समावेश आहे. प्रशिक्षकपदी प्राची वाईकर यांची निवड झाली आहे. सव्वीस वर्षीय प्रियंका इंगळेने आतापर्यत खो – खोच्या 17 राष्ट्रीय स्पर्धा जिंकल्या आहेत. सध्या प्रियंका खेळाडूंच्या कोट्यातून पुणे येथे क्रीडा अधिकारी पदावर नुकतीच सेवेत रूजू झाली आहे.