टीम AM : राज्यात पुन्हा थंडीचा जोर वाढू लागला आहे. वाऱ्याची चक्राकार दिशा आणि अरबी समुद्रात आर्द्रता वाढत असल्याने तापमानात घट झाली आहे. किमान तापमानात दोन ते तीन अंश सेल्सिअसने ही घट झाली आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून हवामानात बदल पहायला मिळत आहे. राज्यात थंडी पुन्हा परतली असून गुरुवारी काही भागात पारा 10 अंश सेल्सिअसच्या खाली घसरला. येत्या 24 ते 48 तासांमध्ये राज्यातील तापमानात सरासरी 3 ते 4 अंश घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. नागरिक थंडीपासून बचाव करण्यासाठी स्वेटर, जर्कींगच्या वापरासह शेकोट्यां पेटवताना दिसून येत आहेत.
अंबाजोगाई शहरासह आसपासच्या परिसरातही गेल्या दोन दिवसांपासून थंडीची लाट दिसून येत आहे. सकाळच्या सुमारास दाट धुक्याची चादर परिसरातील डोंगरांवर आणि शेत शिवारांवर पसरत आहे. दिवसभर काहीसे उन्हे जाणवल्यावर पुन्हा सायंकाळच्या सुमारास वातावरणात कमालीचा गारवा जाणवत आहे. कामगार, दुग्ध विक्रेते, शाळकरी विद्यार्थी, शेतमजूर यांना या थंडीचा सर्वाधिक सामना करावा लागत आहे.
पश्चिम महाराष्ट्रासह, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही थंडीत वाढ झाली आहे. पुढील दोन दिवस तापमान आणखी कमी होण्याची शक्यता आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये कडाक्याची थंडीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.