टीम AM : अंबाजोगाई शहरात मुस्लीम समाजाचा दोन दिवसीय जिल्हास्तरीय इज्तेमा अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात काल पार पडला. सदर बाजार नजीक चांदमारी परिसरात जवळपास दीडशे एकर भागावर इज्तेमासाठी अत्यंत नियोजनबद्ध तयारी करण्यात आली होती. इज्तेमासाठी जिल्हाभरातील सर्व तालुक्यातून जवळपास दोन लाख मुस्लीम बांधवांनी प्रार्थनेसाठी एकत्र येत सर्वांच्या हिताची आणि कल्याणाची दुवा मागितली.
मोहम्मद पैगंबर यांनी दाखविलेल्या मार्गावर सर्व आबालवृद्धांनी चालावे, सर्वांसोबत सज्जन पणाने वागावे व सर्व मानवांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची सुद्धा गांभीर्याने दखल घ्यावी, अशी प्रार्थना व सूचना मौलाना यांनी केली. विशेष म्हणजे इज्तेमामध्ये एकही रुपया खर्च न करता अत्यंत साधेपणाने काही जोडप्यांचे विवाह पार पडले. अत्यंत शांत आणि सौहार्दपूर्ण वातावरणात इज्तेमा पार पडला.
मंत्री मुंडे यांनी दिली भेट
अंबाजोगाई येथील इज्तेमाच्या समारोप प्रसंगी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी उपस्थित राहून उपस्थित मुस्लिम समाज बांधवाशी संवाद साधत शुभेच्छा दिल्या. यावेळी वक्फ बोर्डाचे समीर काझी, समाजसेवक शकील भाई यांच्यासह आदी मुस्लिम बांधव उपस्थित होते.