टीम AM : कोरेगाव भीमा नजीक पेरणेफाटा (ता. हवेली) येथे 207 व्या शौर्यदिनानिमित्त ऐतिहासिक विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी भीम अनुयायांचा जनसागर लोटला होता. हाती निळ्या ध्वजांसह ‘जय भीम’ च्या घोषणा देत लोटलेल्या लाखो अनुयायांच्या गर्दीने पुणे – अहिल्यानगर रस्ता अक्षरश: फुलून गेला होता. दरम्यान, काल दिवसभर विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी भीम अनुयायांसह अनेक मान्यवरांनीही मोठी गर्दी केली होती.
31 डिसेंबरला रात्रीच सामुदायिक बुद्ध वंदनेसह पहाटेपर्यंत धम्मदेशना, धम्मपठण अशा कार्यक्रमांसह सकाळी प्रशासनाकडून तसेच महार रेजिमेंट, समता सैनिक दलाच्या सलामीनंतर अभिवादनास सुरुवात झाली. दरम्यान, अभिवादन कार्यक्रमाचे थेट प्रसारणही प्रशासनाने दूरदर्शन व समाजमाध्यमांवर केले होते. थेट प्रसारणाची सोय असूनही गर्दीने स्तंभपरिसर व अहिल्यानगर रस्ता अक्षरश: फुलून गेला होता.
काल मध्यरात्रीही दुचाकी रॅलीसह मोठ्या संख्येने आलेल्या अनुयायांच्या गर्दीमुळे पुण्यात वाहतूक कोंडी झाली होती. दुपारनंतरही अभिवादनासाठी मोठी गर्दी वाढली. सायंकाळी उशिरापर्यंत अभिवादनासाठी दोन्ही बाजूंनी अनेक बांधव येतच होते. त्यामुळे मोठी गर्दी झाली होती. पुणे जिल्हा प्रशासनाच्या वतीने भीमा कोरेगाव परिसरात सर्व सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या.