टीम AM : नववर्षाच्या पहिल्या दिवशी देवदर्शनासाठी जातांना झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात 8 भाविक ठार झाले. जालना जिल्ह्यात धुळे – सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील महाकाळा इथं महामार्गावर नादुरुस्त झाल्यामुळे उभ्या असलेल्या ट्रकला छत्रपती संभाजीनगरकडे जाणारी भरधाव कार मागून धडकल्याने झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातले 4 जण जागीच ठार झाले तर 2 जण गंभीर जखमी झाले. आज दुपारी दोन वाजता हा अपघात घडला. अपघातग्रस्त कारमध्ये सहाजण होते. यातल्या चौघांचा जागीच मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले.
मृतांमध्ये दोन महिलांसह एका 11 वर्षीय मुलीचा समावेश आहे. या अपघातातील मृत आणि जखमी सर्वजण छत्रपती संभाजीनगर इथले रहिवासी आहेत. ते अक्कलकोटहून छत्रपती संभाजीनगरला परतत होते.
अन्य एका अपघातात सोलापूर जिल्ह्याच्या अक्कलकोटमधील मैंदर्गी इथं भाविकांची चारचाकी गाडी आणि ट्रकची धडक होऊन 4 भाविक जागेवरच ठार झाले तर 7 जण जखमी झाले. मृतांमध्ये दोन महीला आणि दोन पुरूषांचा समावेश आहे. हे सर्वजण अक्कलकोटहून गाणगापूरला दर्शनासाठी जातांना हा अपघात झाला. गंभीर भाविकांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. हे सर्व नांदेड जिल्ह्यातील रहिवासी असल्याचं पोलिस सूत्रांनी सांगितलं. या दोन्ही घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.