टीम AM : आज 31 डिसेंबर, सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचं स्वागत करण्याचा दिवस. नव्या वर्षाचं उत्साहात आणि जल्लोषात स्वागत करण्यासाठी नागरिक उत्सुक असून, विविध पर्यटन स्थळ नागरिकांनी फुलून गेली आहेत. अंबाजोगाई शहरही नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहे. दुपारपासूनचं तरुणाई नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी करताना दिसून येत आहे. शहरातील बेकरीत ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येत आहे.
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी अंबाजोगाईकरांत उत्साह दिसून येत आहे. नववर्ष आगमनाच्या शुभेच्छा संदेशांची देवाणघेवाणही सुरू झाली आहे. शहरातील विविध प्रभागात, वस्त्यांत स्वागताची तयारी जोमाने सुरू आहे. काही ठिकाणी मोठमोठे साऊंडही लावण्यात आले असून तरुणाई रात्री डीजेच्या गाण्यावर ठेका धरणार आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी हॉटेल्स, रेस्टॉरंट्समध्येही गर्दी दिसून येत आहे.
दरवर्षी 31 डिसेंबरच्या रात्री लोक जुन्या वर्षाचा आनंदाने निरोप घेतात आणि रात्री 12 वाजता अनेक आशा आणि स्वप्नांसह मोकळ्या हातांनी नवीन वर्षाचे स्वागत करतात. खरे तर येणारे नवीन वर्ष आपल्यासोबत नवीन आनंद, नवीन स्वप्ने आणि भरपूर उत्साह घेऊन येत आहे, त्यामुळे नागरिक नवीन वर्षाचे मोठ्या उत्साहात नाच – गाणी करून स्वागत करतात आणि नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सर्वजण आपला आनंद साजरा करतात. दरम्यान, अंबाजोगाई शहरात नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर काही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने तगडा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. नागरिकांनी शांततेत आणि आनंददायी वातावरणात नवीन वर्षाचे स्वागत करावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.