टीम AM : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या केंद्रीय युवक महोत्सवात अंबाजोगाई येथील योगेश्वरी महाविद्यालयाच्या ईश्वरी खाडे या बी.एससी. तृतीय वर्षाच्या विद्यार्थीनीने भारतीय शास्त्रीय नृत्यामध्ये भरतनाट्यम कलाप्रकारात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. युवक महोत्सवात भरतनाट्यम कलाप्रकारात ईश्वरीने ‘शंभो…’ हे किर्तनम सादर केले.
भरतनाट्यमसाठी तिला पचंमवेद अकादमीचे गुरु डॉ. विनोद निकम आणि अनुराधा निकम यांचे मार्गदर्शन लाभले. हा कलाप्रकार सादर करताना रंगमंचावर तिला साथसंगतामध्ये गायण – डॉ. विनोद निकम, मृदंग – अरविंद चाटे, वीणावादन – आनंद लक्ष्मी (हैदराबाद) यांनी सहकार्य केले. भरतनाट्यम हा कलाप्रकार सादर करताना ईश्वरीने आपल्या अभिनयाने नाट्यगृहातील रसिकांना मंत्रमुग्ध केले.
‘महाराष्ट्राची हास्य जत्रा’ फेम सुप्रसिद्ध अभिनेते समीर चौघुले यांच्या हस्ते ईश्वरीने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक स्वीकारले. तिला सहकार्य योगेश्वरी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कानिटकर, प्रा. सचिन कळलावे, प्रा. सुर्वे, प्रा. मीरा खाडे यांनी केले. तिच्या यशाबद्दल ‘अंबाजोगाई मिरर’ चे संपादक महादेव गोरे यांनी अभिनंदन केले आहे. ईश्वरी खाडे या विद्यार्थीनीचे सर्व स्तरांतून अभिनंदन करण्यात येत आहे.