टीम AM : महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल लागून सात दिवस उलटल्यानंतर अखेर शपथविधी कधी होणार हे स्पष्ट झालं आहे. 5 डिसेंबरला राज्यातील महायुती सरकारचा शपथविधी पार पडणार असल्याचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केलं. त्यांनी आपल्या अधिकृत एक्स (पूर्वीचं ट्विटर) अकाउंटवरून याबाबत माहिती दिली आहे.
शपथविधीची तारीख जाहीर झाली असली तरी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कुणाची वर्णी लागणार याबाबत अद्यापही सस्पेंस कायम आहे. त्यामुळे मुख्यमंत्रीपदी कुणाची निवड होणार ? याबाबत अनेक तर्क – वितर्क लावले जात आहेत.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या एक्स अकाउंटवर म्हटले आहे की, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत गुरुवारी 5 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजता आझाद मैदान, मुंबई येथे ‘महायुती’ सरकारचा शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे.’ दरम्यान, शपथविधी सोहळ्याची जय्यत तयारी सुरु झाली असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली आहे.