टीम AM : अंबाजोगाई तालुक्यातील काही भागात बिबट्याने धुमाकूळ घातला असून त्याच्या वावराने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. पुस – जवळगाव, ममदापूर – पाटोदा या नंतर आता बिबट्याने माकेगाव परिसरात मोर्चा वळवला आहे. माकेगाव येथील शेतकरी रवि देशमुख यांच्या शेतातील बैलाचा बिबट्याने फडशा पाडला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी त्याचा शोध घेत आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
या संदर्भात वन विभागाच्या अधिकारी विजया शिंगाटे यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी सांगितले की, अंबाजोगाई तालुक्यातील पुस – जवळगाव भागातील ग्रामस्थांनी बिबट्याची माहिती दिल्यानंतर आम्ही त्या परिसराला भेट देऊन त्या ठिकाणची पाहणी केली आहे. या पाहणीत आम्हाला बिबट्याचे ठसे आढळून आले आहेत. त्यानंतर काल रात्री ममदापूर – पाटोदा परिसरातील ग्रामस्थांनीही बिबट्याच्या वावराची माहिती दिली. त्याही भागात आम्ही काल रात्रीच पेट्रोलिंग करत पाहणी केली आहे. तसेच या परिसरातील ग्रामस्थांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान, आज सकाळी माकेगाव परिसरातील रवि देशमुख यांच्या शेतातील बैलाचा बिबट्याने फडशा पाडला असल्याची माहिती मिळाली. आम्ही लागलीच त्या ठिकाणी आमची टीम घेऊन गेलो आणि सदरिल घटनेचा पंचनामा केला. त्यासोबतच पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांनीही सदरिल घटनेचा पंचनामा करीत ‘त्या’ बैलाचे शवविच्छेदन केले आहे. यात बिबट्यानेच त्याचा फडशा पाडला असल्याचं उघडकीस आले आहे. त्यामुळे आम्ही बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यासाठी आम्ही या परिसराची पाहणी केली असून राडी शिवारात बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पिंजरा लावणार आहोत. तसेच माकेगाव येथील शेतकरी रवि देशमुख यांना नुकसान भरपाई देण्यासाठी कार्यवाही सुरु केली असल्याचे विजया शिंगाटे यांनी आमच्याशी बातचीत करताना सांगितले.
ग्रामस्थांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन
अंबाजोगाई तालुक्यातील पुस – जवळगाव, ममदापूर – पाटोदा या भागात ऊसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असून या ठिकाणी लपण्यासाठी बिबट्याला पाहिजे तशी जागा आहे. त्यामुळे निश्चितच तो या ठिकाणी वावरत असणार आहे. शेतकऱ्यांनी शेतात जाताना एकटं जाऊ नये, त्यासोबतच शेतात राहणाऱ्या ग्रामस्थांनी लहान मुलांना एकटं सोडून नये, शेतात फिरताना जमावाने जावं आणि सोबत लाकडी काठी किंवा इतर साहित्य घेऊन जावं. पुस – जवळगाव, ममदापूर – पाटोदा या भागातील ग्रामस्थांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करीत बिबट्या दिसताच वनविभागाला कल्पना द्यावी, असं आवाहनही वन अधिकारी विजया शिंगाटे यांनी केले आहे.