टीम AM : अंबाजोगाई तालुक्यातील काही भागात बिबट्याने धुमाकूळ घातला असून त्याच्या वावराने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. पुस – जवळगाव, ममदापूर – पाटोदा या नंतर आता बिबट्याने माकेगाव परिसरात मोर्चा वळवला आहे. माकेगाव येथील शेतकरी रवि देशमुख यांच्या शेतातील बैलाचा बिबट्याने फडशा पाडला आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, वनविभागाचे अधिकारी, कर्मचारी बिबट्याला जेरबंद करण्यासाठी त्याचा शोध घेत आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
या बाबत प्राप्त माहिती अशी की, पुस – जवळगाव परिसरात विवेक आटोळे यांच्या शेतात काल बिबट्याचा वावर दिसून आला. त्याने एका शेळीचा फडशा पाडला असल्याची चर्चा चांगलीच रंगली होती. ही घटना ताजी असतानाच काल रात्री पुन्हा ममदापूर – पाटोदा परिसरातील लेंडी शिवारात बिबट्या दिसून आला आहे. एका ग्रामस्थाने बिबट्याचा व्हिडिओ त्याच्या चारचाकी गाडीतून कैद केला आहे. तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर आता बिबट्या माकेगाव शिवारात शिरला आहे. माकेगाव परिसरातील कॅनालच्या बाजूला असलेल्या पत्री पुलाजवळ बिबट्याने रवि देशमुख यांच्या बैलाचा फडशा पाडला आहे. त्यामुळे देशमुख यांचं मोठं नुकसान झालं आहे. दरम्यान, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्या दिसताच वनविभागाला कल्पना द्यावी, असं आवाहन केले आहे. त्यासोबतच ग्रामस्थांनी शेतात जाताना सतर्कता बाळगण्याचेही आवाहन त्यांनी केले आहे.