टीम AM : अंबाजोगाई तालुक्यात एक खळबळजनक घटना समोर आली आहे. ममदापूर – पाटोदा परिसरातही बिबट्याचा वावर दिसून आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुस – जवळगाव परिसरातील शेतकऱ्यांनाही कालचं बिबट्याचा वावर दिसून आला होता. दरम्यान, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या दोन्ही परिसरातील ग्रामस्थांना सतर्कता बाळगण्याचे आवाहन केले आहे.
या बाबत प्राप्त माहिती अशी की, पुस – जवळगाव परिसरात विवेक आटोळे यांच्या शेतात काल बिबट्याचा वावर दिसून आला. त्याने एका शेळीचा फडशा पाडला असल्याची चर्चा चांगलीच रंगली होती. ही घटना ताजी असतानाच काल रात्री पुन्हा ममदापूर – पाटोदा परिसरातील लेंडी शिवारात बिबट्या दिसून आला आहे. एका ग्रामस्थाने बिबट्याचा व्हिडिओ त्याच्या चारचाकी गाडीतून कैद केला आहे. तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमुळे परिसरातील ग्रामस्थांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी बिबट्या दिसताच वनविभागाला कल्पना द्यावी, असं आवाहन केले आहे. त्यासोबतच ग्रामस्थांनी शेतात जाताना सतर्कता बाळगण्याचेही आवाहन त्यांनी केले आहे.