विधानसभा निवडणूक : प्रचार थांबला, हेलिकॉप्टरच्या मदतीनं मतदान पथकं रवाना

टीम AM : विधानसभा निवडणुकीसह नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीचा प्रचार आज थांबला. राज्यात विधानसभेच्या 288 तसंच नांदेड लोकसभेच्या एका जागेसाठी परवा बुधवारी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. राज्यभरातल्या 9 कोटी 70 लाख 25 हजार 119 मतदारांसाठी, 1 लाख 427 मतदान केंद्रं उभारण्यात आली आहेत. 

संवेदनशील मतदान केंद्रांवर केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. गडचिरोली जिल्ह्यातल्या संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रांवर वायुसेनेच्या हेलिकॉप्टरच्या मदतीनं मतदान पथकं रवाना होत आहेत.

मतदानापूर्वीच्या या शांतता काळात, मतदारांवर प्रभाव पाडणाऱ्या, निवडणूक निकालावर परिणाम करणाऱ्या बाबी प्रदर्शित करण्यास निवडणूक आयोगाने माध्यमांना मनाई केली आहे. दृकश्राव्य माध्यमांनी अशा बातम्या प्रदर्शित करु नयेत. तसेच राजकीय जाहिराती, कार्यक्रम, सार्वजनिक सभा, मिरवणुका आयोजित करण्यास बंदी घालण्यात आली असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत देण्यात आली आहे. प्रशासनाकडून मतदान प्रक्रियेची संपूर्ण तयारी झाली असून, राज्यातल्या मतदारांनी मोठ्या संख्येनं मतदान करण्याचं आवाहन मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी केलं आहे.