टीम AM : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. नेत्यांनी सगळीकडे प्रचार सभांचा धुराळा उडवून दिला आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते शरद पवार यांच्या सभेत पावसाने पुन्हा हजेरी लावली.
शरद पवार म्हणाले की, माझ्या जाहीर सभेचा आणि पावसाचा काही संबंध नाही, परंतू, सभेवेळी पाऊस आल्यामुळे निकाल चांगला लागेल, असे वक्तव्य शरद पवारांनी केले. इचलकरंजी येथील सभेला शरद पवार संबोधित करत होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले की, महाराष्ट्रात मी सभेत बोलायला उभा राहिलो की, पावसाला सुरुवात होते. पडत्या पावसात मी बोललो की निकालही चांगले लागतात. मध्यंतरी देशाची लोकसभेची निवडणूक झाली. आता विधानसभेची निवडणूक आहे. या निवडणुकीत महाराष्ट्राचा कारभार कोणाच्या हातात द्यायचा याचा निकाल आपल्याला घ्यायचा आहे. ज्यांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता दिली, त्यांचा अनुभव बघितला तर त्यांच्यात बदल केल्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. सत्तेत बदल करायचा असेल तर महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या संख्येने विजयी करुन सरकार बनवण्याचे ऐतिहासिक काम येत्या 20 तारखेला तुम्हाला करायचे आहे.
शरद पवार म्हणाले की, भरपावसात तुम्ही या ठिकाणी आले. आमची भूमिका समजून घेण्याची तयारी केली, त्यासाठी तुम्हाला लाख लाख धन्यवाद. जोरदार पावसामुळे अवघ्या 10 मिनिटात सभा उरकण्यात आली.