टीम AM : केज विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूकीचे वातावरण चांगलेच तापले असून मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मतदानासाठी केवळ पाच दिवसांचा कालावधी राहिल्याने सर्वच उमेदवारांनी प्रचाराचा धुरळा उडविला आहे. अशातच विद्यमान आमदार नमिता मुंदडांची केज मतदारसंघात चांगलीच कोंडी झाल्याचे दिसून येत आहे. विरोधकांनी मुंदडांची चांगलीच कोंडी केल्याने त्या आणि त्यांचे सहकारी हतबल झाल्याचे दिसून येत आहे. त्यातच मुंदडांना अजून एक धक्का बसला आहे. बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाबुराव पोटभरे, लोकजनशक्ती पार्टीचे राजेश वाहुळे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे बब्रुवाहन पोटभरे आणि प्रहार संघटनेच्या वतीने महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यामुळे निश्चित केज विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूकीत माजी आमदार पृथ्वीराज साठे यांची ताकद वाढली आहे.
केज विधानसभा मतदारसंघात गेल्या तीस वर्षांपासून मुंदडा यांची एकहाती सत्ता राहिली आहे. विमल मुंदडा यांच्यानंतर त्यांच्या सून नमिता मुंदडा या सध्या विद्यमान आमदार आहेत. तीस वर्षे एकहाती सत्ता असूनही केज मतदारसंघातील जिव्हाळ्याच्या प्रश्नांना त्यांना हात घालता आला नाही किंबहुना सोडविता आले नाहीत. अंबाजोगाई जिल्हृयाचा प्रश्न, ‘एमआयडीसी’, बुट्टेनाथ साठवण तलाव, टेक्सटाइल पार्क अशी अनेक आश्वासनं हवेतच विरली आहेत. त्यामुळे केज मतदारसंघातील जनता त्यांच्यावर नाराज असल्याचे दिसून येत आहे. याचा फटका त्यांना विधानसभा निवडणुकीत बसणार असल्याची चर्चा सध्या मतदारसंघात सुरु आहे.
केज विधानसभा मतदारसंघाची निवडणूक घोषित झाल्यापासून विद्यमान आमदार नमिता मुंदडां यांच्याविरोधात कोण ? असा प्रश्न मतदारसंघातील जनतेसमोर उभा होता. त्याचं कारणही तसेच होते. माजी आमदार पृथ्वीराज साठे, माजी आमदार संगिता ठोंबरे, डॉ. अंजली घाडगे यांच्यासह अन्य उमेदवारांनी महाविकास आघाडीकडून उमेदवारी मागितली होती. त्यामुळे महाविकास आघाडीकडे उमेदवारीबाबत चांगलाच पेच निर्माण झाला होता. परंतू, बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या शिष्टाईने हा पेच सुटला आणि माजी आमदार पृथ्वीराज साठे यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली. खासदार बजरंग सोनवणे यांनी नंतरच्या काळात यशस्वी मध्यस्थी करत माजी आमदार संगिता ठोंबरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात प्रवेश दिला आणि महाराष्ट्र उपाध्यक्षपदी नियुक्तीही जयंत पाटील यांच्या हस्ते दिली. पृथ्वीराज साठे यांच्या विजयासाठी अंजली घाडगे यांच्यासोबत संगिता ठोंबरे ही मैदानात उतरल्या आहेत आणि प्रचाराला सुरुवातही केली आहे.
केज मतदारसंघात अंबाजोगाई शहर हे सर्वात मोठे शहर असून या ठिकाणी माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांची पकड मजबूत आहे. मुंदडा यांचे मोदी कट्टर विरोधक मानले जातात. त्यांनीही यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मुंदडांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. कार्यकर्त्यांची संवाद बैठक घेत राजकिशोर मोदी यांनी पृथ्वीराज साठे यांना पाठिंबा दिला आहे आणि प्रचारात सक्रिय ही झाले आहेत. अंबाजोगाई शहरातील पुर्ण ताकद मोदींनी साठेंच्या मागं उभी केली आहे. दुसरीकडे केज येथील हारुन इनामदार आणि नगराध्यक्षा सीता बनसोड यांनीही जनविकास आघाडीची पुर्ण ताकद पृथ्वीराज साठे यांना देण्याचे जाहीर केल्याने मुंदडा यांचे धाबे दणाणले आहेत. त्यानंतर आता बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाबुराव पोटभरे, लोकजनशक्ती पार्टीचे राजेश वाहुळे, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे बब्रुवाहन पोटभरे आणि प्रहार संघटनेच्या वतीने महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.
त्यामुळे विद्यमान आमदार नमिता मुंदडा यांना सुरुवातीला सोपी वाटणारी निवडणूक अवघड होऊन बसली आहे. विरोधकांच्या कोंडीत नमिता मुंदडा पुर्ण अडकल्या आहेत. मतदानाच्या प्रचारासाठी अजून तीन दिवसांचा कालावधी राहिला आहे, यात आणखी काय बदल होतात, हे काळ आणि वेळेचं ठरवेल. पण केज मतदारसंघात नमिता मुंदडा यांची चांगलीच कोंडी झाली आहे, हे मात्र निश्चित आहे.