टीम AM : केज विधानसभा मतदारसंघाची निवडणूक आता चांगलीच तापली असून मतदारसंघांमध्ये प्रचाराचा धुरळा उडाला आहे. अंबाजोगाईतही निवडणुकीचे वारे जोराने वाहू लागले आहेत. या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान अंबाजोगाईत एका गोष्टीची जोरदार चर्चा सुरू आहे. ती गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चौकात लावलेल्या फ्लेक्सची. हा फ्लेक्स कोणी लावला, हे अद्याप समोर आले नाही पण त्यावर लिहिलेले ‘आता फक्त रामकृष्ण हारी…’हे सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
केज विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूकीत प्रचारासाठी अवघे पाच दिवस राहिले आहेत. मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी राजकीय पक्षांचे उमेदवार वेगवेगळ्या युक्त्या वापरत आहेत. दररोज अंबाजोगाई शहरात विविध राजकीय पक्षांच्या प्रचाराची वाहनं आणि प्रचारफेरींची रेलचेल आहे. तसेच सोशल मीडियावर उमेदवारांच्या प्रचाराच्या रिल्सनं धुमाकूळ घातला आहे. सोशल मीडियावर आरोप - प्रत्यारोप देखील मोठ्या प्रमाणात होत असून राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आपल्या नेत्याची, पक्षाची बाजू मांडताना दिसून येत आहेत. यात मात्र, शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील फ्लेक्स सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ‘आता फक्त रामकृष्ण हारी…’हे वाक्य लिहिलेले फ्लेक्स केज मतदारसंघाच्या निवडणूकीचे वातावरण बदलायला भाग पाडत आहे. केज विधानसभा मतदारसंघाच्या मतदानाला अवघे सात दिवस बाकी आहेत. मतदारसंघातील जनता नेमकी कुणाला कौल देते ? हे येणाऱ्या 23 तारखेलाच कळेल. परंतू, ‘त्या’ फ्लेक्सची चर्चा जोरदार सुरू आहे, हे मात्र निश्चित आहे.