केज मतदारसंघात केवळ गुत्तेदार पोसण्याचेच झाले काम
टीम AM : लोकसभा निवडणुकीत घटलेले मताधिक्य, विकासाचा अभाव या व अशा अनेक कारणांमुळे केज विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार नमिता मुंदडा यांना ही निवडणूक जड जाणार असल्याची चर्चा मतदारांमध्ये होत आहे. ‘महायुती’ ने त्यांना पुन्हा उमेदवारी दिली असली तरी मतदार संघात पाच वर्षात फारसा विकास नसल्याने त्यांच्या विरोधात नाराजी व्यक्त होत आहे. त्यामुळे आ. मुंदडा यांना यंदाच्या निवडणुकीत संघर्ष करावा लागत आहे.
विद्यमान आमदार नमिता मुंदडा यांनी 2019 च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उमेदवारी जाहीर झालेली असताना ऐनवेळी पक्षांतर करून भाजपामध्ये उडी घेतली. त्या निवडून आल्या. मात्र, गेल्या पाच वर्षात या मतदारसंघात विकास कसलाही झाला नाही. केवळ गुत्तेदार पोसणे हाच एकमेव कार्यक्रम मतदारसंघात झाला. अंबाजोगाई शहरातील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात अजूनही असुविधांचा सामना करावा लागतो. अनेक डॉक्टर, कर्मचारी यांची पदे रिक्त आहेत. गेल्या पाच वर्षांत याकडे मुंदडा यांचे साफ दुर्लक्ष झाले. रुग्णालयात आठ – आठ दिवस पाणी पुरवठा होत नाही. अनेक इमारतींचे बांधकाम रखडलेले आहेत. मतदारसंघात सिंचनाचा एकही नवा प्रकल्प आला नाही. तसेच पायाभूत सुविधांचा मोठा अभाव आहे. अजूनही रस्ते, वीज, पाणी या पायाभूत सुविधा उपलब्ध नाहीत. अनेक गावच्या पाणीपुरवठा योजना रखडलेल्या आहेत.
गावांना जोडणारे रस्ते नसल्याने दळण – वळणाच्या साधनांचा मोठा अभाव आहे. अनेक गावांमध्ये एक महिना महिना ट्रॉन्सफॉर्मर बसविला जात नाही. याचा मोठा फटका ग्रामस्थांना सहन करावा लागतो. परिणामी याचा मोठा फटका सिंचन व पाणीपुरवठा योजनांना बसतो. केज विधानसभा मतदारसंघात अंबाजोगाई, केज ही मोठी शहरे आहेत. या शहरांमध्ये ‘एमआयडीसी’ निर्मिती झाली तर तरुणांना रोजगारांना वाव मिळेल. छोटे व्यवसाय व उद्योग यांची उभारणी होईल. मात्र, या औद्योगिक धोरणांबाबत विद्यमान आमदार नमिता मुंदडा यांनी अनास्था दाखविल्यामुळे मतदारसंघात बेरोजगारीची समस्या कायम आहे.
खासदार बजरंग सोनवणेंना मताधिक्य
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत केज विधानसभा मतदारसंघात खा. बजरंग सोनवणे यांना साडेआठ हजार मतांची आघाडी आहे. त्यातच न झालेली विकास कामे, केवळ घोषणाबाजी करण्याचेच काम मुंदडा यांनी गेल्या पाच वर्षांत केले. त्यामुळे मतदार संघातील लोकांमध्ये मुंदडा यांच्याबद्दल नाराजी आहे. या सर्वांचा मोठा फटका आ.नमिता मुंदडा यांना बसणार आहे.