टीम AM : निवडणूक आली की, आश्वासनांची खैरात वाटायची, मतदारांना भावनिक करायचं आणि मतदान आपल्या पदरात पाडून घ्यायचं आणि निवडणूक जिंकायची. पुन्हा मतदारांना आणि त्यांच्या प्रश्नांना वाऱ्यावर सोडायचं आणि ठराविक लोकांसाठीचं आणि त्यांच्याच विकासासाठी राजकारणं करायचं. लोकप्रतिनिधींच्या या खेळाला जनता कंटाळली असून अंबाजोगाईतील पोखरी रोड भागातील जनतेने विधानसभा निवडणुकीत एक धक्कादायक पाऊल उचलले आहे. लोकप्रतिनिधींच्या आश्वासनांना कंटाळून चक्क त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या मतदानावरचं बहिष्कार टाकला आहे. याची चर्चा मात्र अंबाजोगाईसह सबंध जिल्ह्यात होत आहे.
या बाबत प्राप्त माहिती अशी की, अंबाजोगाई शहराच्या दक्षिणेला तथागत चौकातून पोखरीकडे जाणाऱ्या पोखरी रोड परिसरात हजारों नागरिक राहतात. या परिसरात रस्ता, नाली, वीज, दिवे यांचा अभाव असल्यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. या भागातील नागरिकांनी अनेक वेळा लोकप्रतिनिधींकडे मागणी करूनही या परिसरात नाल्या बांधल्या नाहीत. त्यामुळे येत्या विधानसभा निवडणूकीत मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय येथील स्थानिक नागरिकांनी घेतला आहे. या संदर्भात स्थानिक नागरिकांची नुकतीच एक बैठक झाली. ज्यात जो उमेदवार नाल्या व नवीन रस्ते, पूल करण्याचे लेखी अश्वासन देईल, त्यांच्या पाठीशी राहण्याचा निर्णय या भागातील नागरिकांनी घेतला आहे. हा परिसर गेल्या कित्येक वर्षांपासून विकासापासून वंचित राहिला आहे. नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकणे म्हणजे लोकप्रतिनिधींचं अपयशचं म्हणावे लागेल. मतदानावर बहिष्कार म्हणजे लोकप्रतिनिधींचं अपयशचं म्हणावे लागेल, अशीच चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे.