टीम AM : राज्यात यावर्षी पाऊस चांगला आल्याने ऊसासह सर्वच पिके जोमात आहेत. परळी मतदारसंघात ऊसाचे क्षेत्र मर्यादित असले तरीही ऊसावरून राजकारण केले जात असून मतदारसंघातील संपूर्ण ऊसाची जबाबदारी मी घेतो, असा विश्वास धनंजय मुंडे यांनी सायगाव व सुगाव येथील बैठकांमधून मतदारसंघातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिला आहे.
विविध योजनांच्या माध्यमातून शेतकरी बळीराजा हा महायुती सरकारसाठी खरोखरच लाडका आहे, हे महायुती सरकारने सिद्ध करून दाखवले आहे. ऊसाच्या गाळपावरून काहीजण राजकारण करत असले तरीही मतदारसंघातील ऊसाचे एकही टिपरू शिल्लक राहणार नाही, त्याचप्रमाणे सर्वांच्या ऊसाला रास्त व योग्य भाव मिळेल याचीही संपूर्ण जबाबदारी मी घेतो, असे वक्तव्य धनंजय मुंडे यांनी अंबाजोगाईतील सायगाव व सुगाव येथे आयोजित बैठकांमध्ये केले आहे.
विकास हिच आपली जात आणि सेवा हाच आपला धर्म मानून मी गेल्या अनेक वर्षांपासून मतदारसंघात विकासाची एक एक वीट रचत आलो आहे. रस्ते, नाल्या, ऊस, बंधारे, सभागृहे याचबरोबर शेतीचा शाश्वत विकास हा माझा ध्यास आहे.
शेकडो शेततळे, सिंचन विहिरी त्याचबरोबर बंधाऱ्यांचे जाळे निर्माण करून मोठ्या प्रमाणावर क्षेत्र आपण जलमय केल्याने बारमाही शेतीचे प्रमाण वाढले असून त्याचा परिणाम शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यात नक्कीच झाले आहे. या भागातील विकासाचा उर्वरित अनुशेष भरून काढण्यासाठी या भागातील जनता खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी राहील, असा मला विश्वास असल्याचेही पुढे बोलताना धनंजय मुंडे म्हणाले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲड. राजेश्वर चव्हाण, तालुकाध्यक्ष राजाभाऊ औताडे, विलास मोरे, अविनाश मोरे, पप्पू पाटील, रणजीत लोमटे, अजीम भाई, हाश्मी सर, जावेद भाई, खिलाफत अली, असीम भाई, माफीज भाई, कैलास मस्के, जाबेर भाई, सादिक भाई आदी उपस्थित होते.