केज मतदारसंघात निधीच्या नावाखाली शेंडी लावायचे धंदे : पृथ्वीराज साठेंच्या विजयावर शिक्कामोर्तब – जयंत पाटील

तीस वर्षात केज मतदारसंघाचा मुंदडांनी काय विकास केला : बजरंग सोनवणे

टीम AM : ‘महायुती’ च्या सरकारनं महाराष्ट्र पिछाडीवर नेण्याचे काम केले असून निवडणुकीच्या तोंडावर नुसती घोषणाबाजी सुरु केली आहे. केज मतदारसंघातही शेकडो कोटींच्या निधींची वल्गना करण्यात येत आहे. हे फक्त शेंडी लावायचे धंदे असून मतदारांनी यांच्या भूलथापांना बळी पडू नये. केज विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत पृथ्वीराज साठे या गरीब आणि साध्या माणसाला उमेदवारी दिली असून साठे जरी गरीब असले तरी मनाने मात्र श्रीमंत आहेत. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पृथ्वीराज साठेंचा विजय निश्चित असून येणाऱ्या 20 तारखेला तुतारी चिन्हावर मतदान करुन विजयावर शिक्कामोर्तब करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले आहे. 

केज विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज साठे यांच्या प्रचारार्थ जयंत पाटील यांच्या जाहीर सभेचे केज येथे आज दिनांक 11 नोव्हेंबर रोजी आयोजन करण्यात आले होते. या सभेला खा. बजरंग सोनवणे, पक्ष नरीक्षक जीवनराव गोरे, उमेदवार पृथ्वीराज साठे, माजी आमदार उषा दराडे, माजी आमदार संगिता ठोंबरे, डॉ. अंजली घाडगे, जेष्ठ नेत्या सुशिला मोराळे, डाॅ. नरेंद्र काळे, बीड जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल सोनवणे, अंबाजोगाई तालुकाध्यक्ष अमर देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या नेत्यांची  उपस्थिती होती. यावेळी केज मतदारसंघाच्या विकासाचा जाहीरनामा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला.

आपल्या भाषणात बोलताना जयंत पाटील म्हणाले की,‌ लोकसभेच्या निवडणुकीत या जिल्ह्याने क्रांतिकारक बदल घडवून आणला आणि खा. बजरंग सोनवणे यांना विजयी केले. केज विधानसभा मतदारसंघाचे अनेक प्रश्न आहेत. आत्तापर्यंत सत्तेत असलेल्या लोकांना ते सोडवता आलेले नाहीत. या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठीची जबाबदारी आता पृथ्वीराज साठे यांच्यावर द्यावी ही विनंती मी मतदारांना करतो आहे. ज्यांच्यावर आजपर्यंत मतदारसंघाची जबाबदारी होती, त्यांनी एकही उद्योग इथे आणला नाही. तरुणांच्या हाताला काम मिळवून दिले नाही, त्यामुळे आता आपल्याला अशी सत्ता उलथून टाकायची आहे. राज्यात आता महाविकास आघाडीचे सरकार येणार असून मतदारसंघातील अंबाजोगाई जिल्ह्याचा प्रश्न, बुट्टेनाथ साठवण तलावाचा प्रश्न आणि ‘एमआयडीसी’ चा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, असं‌ जयंत पाटील म्हणाले.

पुढे बोलताना जयंत पाटील म्हणाले की, निवडून येण्यासाठी राज्य सरकारने प्रचंड भुरटेपणा केला आहे. तिजोरीत पैसा नाही आणि योजनांचा वर्षाव केला. सगळ्या ऑर्डर पास केल्या. यांची विधायक आणि विकासाची भाषा नाही. ‘बटेंगे तो कटेंगे’ यापेक्षा यांच्या बुद्धीची मर्यादा पुढे जात नाही. पैसा, संपत्ती, सत्ता हे येतं आणि जातं. मात्र, राजकारणात प्रामाणिकपणा आणि निष्ठेला खूप महत्त्व आहे. त्यामुळे पृथ्वीराज साठे यांच्या पाठी खंबीरपणे उभे रहा, असं आवाहनही जयंत पाटील यांनी यावेळी केले.

तीस वर्षात केज मतदारसंघाचा मुंदडांनी काय विकास केला : बजरंग सोनवणे

केज‌ विधानसभा मतदारसंघात ज्यांची तीस वर्षे एकहाती सत्ता राहिली आहे, त्या मुंदडांनी मतदारसंघासाठी काय केले ? असा सवाल खासदार बजरंग सोनवणे यांनी उपस्थित केला आहे. केवळ मतदारसंघात आडवाआडवीची काम करुन जनतेला वेठीस धरण्याचं काम गेल्या दिर्घ काळापासून सुरू आहे. याला आता केज मतदारसंघातील जनता कंटाळली असून यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मुंदडांना चांगलाच धडा शिकवणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडून (शरद पवार) पृथ्वीराज साठे यांना उमेदवारी जाहीर झाली त्याच दिवशी त्यांचा‌ विजयी झाला आहे. आता तर माजी आमदार संगिता ठोंबरे, डॉ. अंजली घाडगे, हारुन इनामदार, नगराध्यक्षा सीता बनसोड यांचीही साथ त्यांना मिळाली आहे. त्यामुळे विरोधकांची झोप उडाली आहे. येणाऱ्या 20 नोव्हेंबरला केज विधानसभा मतदारसंघाच्या विकासासाठी आपल्याला पृथ्वीराज साठे यांना प्रचंड मतांनी विजयी करायचे आहे, त्यासाठी मतदारांनी विरोधकांच्या भुलथापांना बळी न पडता तुतारी या चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन बजरंग सोनवणे यांनी केले आहे.

केज मतदारसंघाच्या विकासासाठी सेवा करण्याची संधी द्यावी : पृथ्वीराज साठे 

केज मतदारसंघातील जनता सुजाण आहे. गेल्या तीस वर्षांत विद्यमान आमदारांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मतदारसंघाची काय अवस्था करुन ठेवलीय आपण ‌पहात आहात. मतदारसंघात तरुणांच्या हाताला काम नाही, पाण्याचे, शेतीचे‌‌ यासह असंख्य प्रश्न जनतेसमोर उभे आहेत. त्या प्रश्नांना बगल देत फक्त गुत्तेदारांचा विकास साधण्याच‌ं‌‌ काम आमदारांनी केले आहे. ही निवडणूक आता जनशक्ती विरुद्ध धनशक्ती अशीच झाली आहे. केज मतदारसंघातील मुलभूत प्रश्न सोडविण्यासाठी आणि मतदारसंघाच्या विकासासाठी आपण मला सेवा करण्याची संधी द्यावी, असं आवाहन करीत येणाऱ्या 20 नोव्हेंबरला तुतारी फुंकणारा माणूस या चिन्हावर मतदान‌ करावं, अशी विनंती उपस्थित जनसमुदायास पृथ्वीराज साठे यांनी केली.

केज‌ येथील जाहीर सभेत माजी आमदार संगिता ठोंबरे, डॉ. अंजली घाडगे, माजी आमदार उषा दराडे, जेष्ठ नेत्या सुशिला मोराळे, बीड जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल सोनवणे, हारुण इनामदार, भाई मोहन‌ गुंड यांच्यासह आदींनी भाषणं‌ केली. या सर्वांनीच विद्यमान आमदारांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केज मतदारसंघाचं कसं वाटोळे केले, त्याचा पाडाच मतदारांसमोर वाचला आणि पृथ्वीराज साठे यांना प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. या सभेला केज मतदारसंघातील जनता मोठ्या संख्येने उपस्थित होती. यात महिलांची संख्या लक्षणीय होती.