विधानसभा निवडणूक‌ : ॲड. अनंतराव जगतकर यांची कॉंग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी, वाचा…

अंबाजोगाईत‌ पत्रकार‌ परिषदेचे आयोजन 

टीम AM : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्ह्यात दररोज नवनवीन राजकीय घडामोडी घडत आहेत. त्यातच आज एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत ॲड. अनंतराव जगतकर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. पत्रकार परिषद घेत जगतकर यांनी आपली भूमिका विषद करताना कॉंग्रेसच्या जेष्ठ नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. 

अंबाजोगाई शहरातील हॉटेल कृष्णाई येथे ॲड. अनंतराव जगतकर यांनी आज दिनांक 5 नोव्हेंबर मंगळवार रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते

या पत्रकार परिषदेत बोलताना जगतकर म्हणाले की, माझ्याकडे केज मतदार संघाच्या विकासाचे व्हिजन असतानाही आणि मी बीड जिह्यातील काँग्रेस नेतृत्वासह वरिष्ठ नेत्याकडे पाठपुरावा करूनही माझ्या उमेदवारीसाठी वरिष्ठांनी प्रयत्न केले नाहीत. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या काळात काँग्रेसचं विभाजन झालं, त्यावेळी काँग्रेसकडे चिटपाखरू देखील राहिलं नव्हतं. त्यावेळी आम्ही 4 – 5 लोकांनी कॉंग्रेसची पुनर्बांधनी केली. मला 1985 ला केज विधानसभेची उमेदवारी देण्यात आली. परंतू, कॉंग्रेस पक्षाच्या अंतर्गत बंडाळीमुळे‌ मला पराभव पत्करावा लागला, असं जगतकर यांनी सांगितले.

पुढे बोलताना जगतकर म्हणाले की, मी काँग्रेसचा प्रदेश प्रतिनिधी आहे. माझ्याकडे केज मतदार संघाच्या विकासाचा ‘मास्टर प्लॅन’ आहे. त्यामुळे विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी  अशोक पाटील यांचा फोन आला. या संदर्भात ऑगस्टमध्ये प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मला लातूर येथे विचारणा केली. त्यानंतर मुंबईतही  मी त्यांची भेट घेतली. विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी मी नंतर स्वतः सर्व्हे केला. यात मला जनतेचा उत्तम प्रतिसाद दिसून आला. त्यामुळे उमेदवारीसाठी मी तयारीही केली. मी शरदचंद्र पवार यांनाही भेटलो. महाविकास आघाडीकडून बीड जिल्ह्यातील काँग्रेसला एक तरी जागा सोडा म्हणून मागणी केली. यावर शरद पवारांनी तुमच्या नेत्यांना बोलायला सांगा, असं सांगितलं. परंतू, कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी केजसाठी आग्रह धरला नाही. जिल्ह्यातील नेते खुशाल आहेत तर दुसरीकडे बीड जिल्ह्यात काँग्रेस संपुष्टात आली आहे. माझ्यासारखा व्यक्ती प्रवाहात राहिला. मात्र, काँग्रेस पक्षात राहून भवितव्य दिसत नाही, कॉंग्रेस पक्ष आता टिंगलटवाळीचा पक्ष झाला आहे, असेही जगतकर यावेळी म्हणाले.

विधानसभा निवडणुकीत कोणत्या पक्षाला पाठिंबा द्यायचा ? याचा निर्णय नंतर घेईल, असे सांगत त्यांनी खा. रजनी पाटील यांच्यावर अप्रत्यक्ष तोफ डागत त्यांनी आजपर्यंत काँग्रेस पक्षाला पोषक परिस्थिती निर्माण केलेली नाही. माझ्या उमेदवारीसाठी काडीचेही प्रयत्न केलेले नाहीत. त्यांनी प्रयत्न केले असते तर केज मतदार संघ काँग्रेस पक्षाला सुटला असता. मात्र, ते प्रयत्न झाले नाहीत. म्हणून मी काँग्रेस पक्षाचा त्याग करत आहे. माझी ओळख काँग्रेस म्हणून आहे. उद्या मी राजीनामा पाठवत असल्याचेही जगतकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.