टीम AM : केज विधानसभा मतदार संघाच्या निवडणूकीत दिवसागणिक राजकीय समीकरणे बदलत असुन ‘अभी नहीं तो कभी नहीं, म्हणत राष्ट्रवादीची (शरद पवार) टीम कामाला लागली आहे. यात आणखी भर म्हणून अंबाजोगाई शहरावर राजकीय पकड मजबूत असणाऱ्या राजकिशोर पापा मोदी यांनीही निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचे ठरविले असून येत्या 6 नोव्हेंबरला राजकिशोर मोदी आपली राजकीय भूमिका जाहीर करणार आहेत, अशी खात्रीलायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, त्यांनी त्यांच्या समाजमाध्यमांंच्या अकाऊंटवर ‘रामकृष्ण हरी…!!!’ अशी पोस्ट केल्याने वृत्ताला दुजोरा मिळाला आहे. राजकिशोर मोदी हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) जेष्ठ नेते असून धनंजय मुंडे यांचे ते समर्थक आहेत.
केज मतदार संघात महत्वाचे केंद्र असलेल्या अंबाजोगाई शहरातच दीर्घ काळ केज मतदार संघाची सत्ता राहिली आहे. अंबाजोगाई शहर मतदार संघातील मोठे शहर असल्याने या शहरातील मतदारांना प्रभावित करण्याकडेच राजकीय नेत्यांचा कल असतो. त्याचे कारण अंबाजोगाई शहराची लोकसंख्या आणि त्यात असणारी मतदारांची संख्या आहे. अत्यंत संवेदनशील असणाऱ्या शहरावर नेहमी पुरोगामी विचारांचा पगडा अधिक राहिला आहे. त्यामुळे भाजपा पेक्षा अधिक काँग्रेस – राष्ट्रवादी पक्षानेच येथे सत्ताकेंद्र ताब्यात ठेवली आहेत. अंबाजोगाई शहरातील राजकारणावर ज्यांचा प्रभाव आहे असे राजकिशोर मोदी भाजपला शह देण्यासाठी आणि पृथ्वीराज साठे यांना आमदार करण्यासाठी सक्रीय झाले आहेत. त्यासाठी मोदींनी माजी नगरसेवक व कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली आहे. या बैठकीत भाजपला सत्तेपासून रोखत साठेंना विजयी करण्याचा निर्धार करण्यात येणार आहे. तशा कार्यकर्त्यांना सुचना देखील दिल्याची माहिती आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोदींच्या रुपान भक्कम पाठींबा मिळाला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीच्या या रणनीतीला भाजप कसा शह देते हे येत्या काही दिवसांत कळेल. पण मोदींनी प्रचाराची धुरा हाती घेतल्यास राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) उमेदवार असणारे पृथ्वीराज साठेंची प्रचार यंत्रणा मजबूत होणार आहे, हे मात्र निश्चित आहे.
नमिता मुंदडांची डोकेदुखी वाढली
केज विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार नमिता मुंदडांना दिवसेंदिवस निवडणूक अवघड होताना दिसून येत आहे. कालच उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी माजी आमदार संगिता ठोंबरे यांनी निवडणुकीतून माघार घेत पृथ्वीराज साठे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यानंतर आता माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी हे देखील मुंदडांना विरोध करण्यासाठी मैदानात उतरणार आहेत आणि पृथ्वीराज साठे यांना विजयी करण्यासाठी मोर्चेबांधणी करणार आहेत. त्यामुळे विद्यमान आमदारांची डोकेदुखी वाढत चालली असून याचा फटका त्यांना विधानसभा निवडणुकीत बसणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात करण्यात येत आहे.