केज विधानसभा निवडणूक : नमिता मुंदडांना आव्हान, माजी आमदार संगिता ठोंबरे यांची माघार, वाचा… 

माजी आमदार संगिता ठोंबरे यांनी पृथ्वीराज साठे यांना दिला जाहीर पाठिंबा 

विद्यमान आमदार नमिता मुंदडा यांच्यासमोर माजी आमदार पृथ्वीराज साठे यांचे तगडे आव्हान

टीम AM : केज विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. माजी आमदार संगिता ठोंबरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत पृथ्वीराज साठे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे व बीडचे खा. बजरंग सोनवणे यांच्या शिष्टाईने माजी आमदार संगिता ठोंबरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे केज मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार माजी आ. पृथ्वीराज साठे यांना मोठी ताकद मिळाली असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे केज विधानसभा मतदारसंघात आता विद्यमान आमदार नमिता मुंदडा यांच्यासमोर माजी आमदार पृथ्वीराज साठे यांचे तगडे आव्हान निर्माण झाले आहे. 

केज विधानसभा मतदारसंघात संगिता ठोंबरे यांनी यापुर्वी 2014 च्या झालेल्या तिरंगी लढतीत भाजपाच्या तिकीटावर विजय मिळवून या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले होते. मात्र, 2019 च्या निवडणुकीत भाजपाने ऐनवेळी उमेदवारी नाकारल्याने त्या निवडणूक रिंगणातुन बाहेर पडल्या होत्या. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत सुरुवातीलाच त्या सक्रीय झाल्या होत्या. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि नंतर मनोज जरांगे पाटील यांच्या त्या संपर्कात होत्या. मनोज जरांगे पाटील यांनी केज विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्याचे जाहीर केल्यानंतर त्यांच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र, आज सकाळी मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेत असल्याचे माध्यमांना सांगितले होते. त्यामुळे संगिता ठोंबरे यांना दिसणारा आशेचा किरण ही धुसर झाला होता.

या सर्व पार्श्वभूमीवर उमेदवारी अर्ज वापस घेण्यासाठी काही मिनिटांचा अवधी शिल्लक राहिलेला असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे व बीडचे खा. बजरंग सोनवणे यांच्या शिष्टाईमुळे तसेच डॉक्टरसेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संगिता ठोंबरे यांनी निवडणुकीमधून माघार घेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे केज मतदारसंघात नमिता मुंदडा यांच्यासमोर पृथ्वीराज साठे यांचे तगडे आव्हान निर्माण झाले आहे, हे मात्र निश्चित आहे.