विधानसभा निवडणूक : उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा उद्या शेवटचा दिवस, बीड जिल्ह्यात ‘या’ मतदारसंघात सर्वाधिक उमेदवार, वाचा… 

टीम AM : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. राज्यातल्या 288 मतदारसंघांमध्ये 7 हजार 66 उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. मराठवाड्यातल्या मतदारसंघांमध्ये सर्वाधिक उमेदवार आहेत तर कोकणात उमेदवारांची संख्या मर्यादित आहे. 

नांदेड जिल्ह्यातल्या भोकर विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे 140 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. त्या खालोखाल बीड जिल्ह्यात माजलगाव मतदारसंघात 98 तर बीडमध्ये 90 उमेदवारांचे अर्ज वैध आहेत. राज्यात महाड विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी म्हणजे फक्त 5 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. मुंबईत चेंबूर, माहीम आणि सिंधुदुर्गातल्या सावंतवाडीत प्रत्येकी 6 तर शिवडी आणि कुडाळमध्ये 7 उमेदवारांचे अर्ज ग्राह्य धरण्यात आले आहेत.

राज्य विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी आपापल्या पक्षातल्या बंडखोरांना शांत करण्याच्या प्रयत्नात असल्याचं दिसून येत आहे. उद्या सोमवारी अर्ज मागे घेण्यात आल्यानंतर राज्यातल्या प्रमुख पक्षांच्या जागावाटपाचं चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षाचे 99 टक्के बंडखोर उमेदवारी अर्ज मागे घेतील, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला आहे. जे बंडखोर उमेदवारी अर्ज मागं घेणार नाहीत, त्यांना 6 वर्षांसाठी पक्षातून निलंबित करू, असा इशारा त्यांनी दिला आहे.