माजी आमदार संगिता ठोंबरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (शरद पवार) जाहीर प्रवेश : पक्षाने दिली मोठी जबाबदारी, वाचा…

टीम AM : केज विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूकीचे वातावरण चांगलेच तापले असून दररोज मतदारसंघात मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. केज विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार संगिता ठोंबरे यांनी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. संगिता ठोंबरे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. 

बीड जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे यांच्या उपस्थितीत संगिता ठोंबरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. यावेळी माजी आमदार संगिता ठोंबरे यांना पक्षाच्या वतीने मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी त्यांची निवड करण्यात आली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या स्वाक्षरीचे‌ पत्र संगिता ठोंबरे यांना खा. बजरंग सोनवणे यांच्या हस्ते देण्यात आले आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ. नरेंद्र काळे, दिलीप काळे, दिपक शिंदे यांच्यासह संगिता ठोंबरे यांचे असंख्य समर्थक उपस्थित होते.

विद्यमान आमदारांची डोकेदुखी आणखी वाढली 

दरम्यान, केज विधानसभा मतदारसंघाच्या विद्यमान आमदार नमिता मुंदडांना दिवसेंदिवस निवडणूक अवघड होताना दिसून येत आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी माजी आमदार संगिता ठोंबरे यांनी निवडणुकीतून माघार घेत पृथ्वीराज साठे यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. त्यानंतर आता माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी हे देखील मुंदडांना विरोध करण्यासाठी मैदानात उतरणार आहेत आणि पृथ्वीराज साठे यांना विजयी करण्यासाठी मोर्चेबांधणी करणार आहेत. आता माजी आमदार संगिता ठोंबरे यांनी आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केल्याने ‌निश्चितच पृथ्वीराज साठे यांची ताकद वाढली आहे. त्यामुळे विद्यमान आमदारांची डोकेदुखी आणखी वाढली असून याचा फटका त्यांना विधानसभा निवडणुकीत बसणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात करण्यात येत आहे.