टीम AM : प्रकाश आणि आनंदाचं पर्व असलेल्या दीपोत्सवात धनत्रयोदशीचा सण आज साजरा होत आहे. पौराणिक कथेनुसार समुद्रमंथनातून अमृतकलश घेऊन प्रकट झालेले भगवान धन्वंतरी यांचं आज पूजन करण्याचा प्रघात आहे. यमदीपदानही आज केलं जातं.
दिवाळीच्या उत्सवाला आज आतिषबाजीनं प्रारंभ होतो. या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर अंबाजोगाईच्या बाजारपेठेत आकाशदिवे, रोषणाईच्या माळा आणि गृहसजावटीच्या साहित्यासह फटाके, फराळाचं साहित्य खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.
दरम्यान, काल सायंकाळी सवत्स धेनू अर्थात गाय वासराच्या पूजनाने वसुबारसेचा सण साजरा झाला. पोषक अन्नघटक असलेलं दूध देणाऱ्या गायीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.