टीम AM : विधानसभा निवडणुकीचा आज उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी पालकमंत्री धनंजय मुंडे आणि माजी आ. संजय दौंड यांच्यात दिलजमाई झाल्याचे दिसून आले. मागील काही काळात नाराज असलेले संजय दौंड हे परळी मतदार संघातून उमेदवारी दाखल करणार असल्याची चर्चा होती. संवाद मेळावा घेत संजय दौंड यांनी नाराजी देखील जाहीर केली होती. मात्र, त्यानंतर पडद्यामागून झालेल्या हालचालीनंतर दोन्ही नेत्यांमध्ये मनोमिलन झाले असून याचा निवडणुकीत फायदा निश्चितच धनंजय मुंडे यांना होणार असल्याचे बोलले जात आहे.
कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दौंड यांच्या अंबाजोगाई येथील फार्म हाऊसवर पत्रकार परिषद घेत आमच्यात भावाप्रमाणे सख्य असल्याचे नमूद केले. पत्रकार परिषदेत बोलताना धनंजय मुंडे म्हणाले की, मधल्या काळात वेगवेगळ्या काही गोष्टी, अफवा आपल्या कानावर आल्या. त्यात माझ्यात आणि संजय भाऊ यांच्यात काही मतभेद आहेत, अशा प्रकारच्या काही बातम्याही प्रसिद्ध झाल्या. संजय भाऊ यांनी एक बैठक घेऊन आपली भूमिकाही स्पष्ट केली. आम्ही सातत्याने परळी मतदारसंघात जनतेची सेवा करीत आलो आहोत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीतही संजय भाऊ यांनी जनतेचे आशीर्वाद मला मिळवून देण्यासाठी परिश्रम घेतले. मी मतदारसंघाचा आमदार झाल्यानंतर स्वाभाविकच संजय भाऊ देखील विधानपरिषदेचे आमदार झाले. माझं आणि त्यांचं नातं, संबंध राजकारणापलीकडचे आहेत. माझ्या राजकारणाच्या सुरुवातीला आमच्या दोघांचा राजकीय संघर्षही झाला. पण 2014 पासून आम्ही एक जीवाने काम करीत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद मतदारसंघात मोठ्या प्रमाणात आहे. मध्ये जे समज – गैरसमज झाले ते काही गावातील गटातटामध्ये काम करणाऱ्या सहकाऱ्यांमुळे झाले असतील, पण आमच्यात कुठलेही मतभेद आणि मनभेद नाहीत, असे धनंजय मुंडे म्हणाले. परळी मतदारसंघात पुर्ण ताकदीने काम करण्याची भूमिका संजय भाऊ यांनी स्पष्ट केली आहे. त्यामुळे मागे ज्या चर्चा झाल्या, त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे, असेही धनंजय मुंडे म्हणाले.
काही लोकांनी बीड जिल्ह्याला बदनाम करण्याचा विडा उचलला आहे
परळी मतदारसंघात ‘महायुती’ पुर्णपणाने एकरूप आहे, परळी मतदारसंघाच्या निवडणूकीत आम्ही ऐतिहासिक विजय सुनिश्चित करण्यासाठी एकत्रित काम करणार आहोत. मी प्रत्येक निवडणूक खूप गांभीर्याने घेतो, काही लोकांनी परळी मतदार संघ आणि बीड जिल्ह्याला बदनाम करण्याचा विडा उचलला आहे. परळीत अराजकता असल्याचा साक्षात्कार नेमकी निवडणूक आल्यावरच कसा होतो ? असा सवालही मुंडे यांनी यावेळी केला.
धनंजय मुंडे 75 हजार पेक्षा जास्त मतांनी निवडून येतील : संजय दौंड
पत्रकार परिषदेत बोलताना माजी आमदार संजय दौंड म्हणाले की, आमच्यात कसलेही मनभेद आणि मतभेद नाहीत. गेल्या काही वर्षांपासून कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि मी राजकारणात एकत्रित काम करीत आहोत. पण राजकीय क्षेत्रात काम करीत असताना गावपातळीवर काही कार्यकर्त्यांमध्ये आपआपसात मतभेद होत असतात. त्यासाठीच आम्ही काही दिवसांपूर्वीच कार्यकर्त्यांची एक बैठक घेतली. त्यांचे विचार ऐकून घेऊन मी दोन दिवसात निर्णय जाहीर करील, अशी भूमिका घेतली. त्यानंतर कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि माझे बोलने झाले आणि आम्ही पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपली भूमिका मांडत आहोत, असे सांगितले. कृषी मंत्री धनंजय मुंडे हे राज्यातील मोठे नेते आहेत. त्यांचं भाषणावर प्रभुत्व आहे. राज्यातील तरुणांचं मतदान खेचून आणण्याची त्यांची क्षमता आहे. पक्षाने त्यांच्यावर फार मोठी जबाबदारी दिली आहे. त्यांना ‘महायुती’ चे सरकार आणण्यासाठी संपूर्ण राज्यभर दौरे करायचे आहेत. त्यांच्या विजयासाठी आम्ही सर्व जण परळी मतदारसंघात उपस्थित आहोत. धनंजय मुंडे हे यंदाच्या निवडणुकीत 75 हजार पेक्षा जास्त मतांनी निवडून येतील, असेही माजी आमदार संजय दौंड यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला बीड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राजेश्वर चव्हाण, दत्ता पाटील, परळी विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष गोविंद देशमुख, अंबाजोगाई तालुकाध्यक्ष राजेसाहेब औताडे, रणजित लोमटे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.