विधानसभा निवडणूक : मराठवाड्यात सर्वाधिक‌ ‘शॅडो’ मतदान केंद्र बीड जिल्ह्यात, वाचा… 

टीम AM : आगामी विधानसभा निवडणूकांसाठी मुख्य निवडणूक विभागामार्फत राज्यात एकूण 24 जिल्ह्यांमध्ये 915 ‘शॅडो’ मतदान केंद्र उभारण्यात येणार आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक 232 ‘शॅडो’ मतदान केंद्र तर सांगलीत 1 ‘शॅडो’ मतदान केंद्र असणार आहे. 

मराठवाड्यातल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 9, बीड इथं 22 आणि नांदेड इथं 12 ‘शॅडो’ मतदान केंद्र उभारण्यात येणार असल्याचं विभागामार्फत सांगण्यात आलं आहे. 

मतदानाच्या दिवशी विशेष मेसेंजर, वॉकी – टॉकी, व्हीएचएफ, वायरलेस सेंटर, वायरलेस कम्युनिकेशन सेवा, सॅटेलाईट फोन, वने आणि पोलीस विभागाचा रनर या विशेष सेवा ‘शॅडो’ मतदान केंद्रात कार्यरत असतील. याशिवाय ‘बीएसएनएल’ मार्फत पर्यायी संदेश वहनाची यंत्रणाही कार्यरत असेल. अनेक ठिकाणी मोबाईल रेंज, संपर्क यंत्रणा, इंटरनेट असे पर्याय नसतात. त्या भागाला ‘शॅडो’ एरिया म्हणतात. अशा भागात ‘शॅडो’ मतदान केंद्र उभारण्यात येतात.