‘त्या’ पात्र महिलांना डिसेंबरचे पैसे मिळणार, वाचा… 

टीम AM : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या निधीला ब्रेक लावण्यात आला आहे आणि नवीन अर्ज स्विकारणेही बंद करण्यात आल्याचे वृत्त अनेक माध्यमांमध्ये झळकले होते. पण आता  ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना’ सुरूच राहणार, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची अंमलबजावणी जुलै 2024 पासून सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र महिलांना दरमहा 1,500 रुपये थेट त्यांच्या आधार लिंक केलेल्या बँक खात्यात जमा केले आहेत. शासनाने जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर 2024 या महिन्यांसाठीचा लाभ आधीच पात्र महिलांच्या खात्यात जमा केला आहे. तसेच 4 ते 6 ऑक्टोबर 2024 दरम्यान ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांचा लाभ राज्यातील 2 कोटी 34 लाख पात्र महिलांना देण्यात आला आहे. 

तसेच सर्व पात्र महिलांना डिसेंबर महिन्याचा लाभ डिसेंबर महिन्यात देण्यात येणार असून या योजनेबाबत कोणत्याही चुकीच्या माहितीला महाराष्ट्रातील माता – भगिनींनी बळी पडू नये, असे आवाहन आदिती तटकरे यांनी केले आहे.