टीम AM : राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली असून सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. त्यातच एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत ‘सी व्हिजिल’ या ॲपवर 667 तक्रारी आल्या असून त्यातल्या 660 तक्रारी निकाली काढण्यात आल्या आहेत.
राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णी यांनी ही माहिती दिली. आचारसंहिता लागू झाल्यानंतर शासकीय, सार्वजनिक, खासगी जागेतल्या विनापरवानगी लावलेल्या जवळपास सात लाख जाहिराती काढण्यात आल्या आहेत. तसंच बेकायदेशीर रोकड, मद्य, अंमली पदार्थ इत्यादी मिळून 14 कोटी 90 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहितीही कुलकर्णी यांनी दिली आहे.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रत्येक मतदारसंघात प्रशासनाने जोरदार तयारी केली असून निवडणूक काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, याची खबरदारी घेतली आहे.