अंबाजोगाईत शिवसेनेची (शिंदे गट) पत्रकार परिषद
टीम AM : शिवसेना संघटनात्मकदृष्ट्या वाढली पाहिजे, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. शिवसेनाप्रमुख एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री करायचे आहे. केज मतदारसंघात शिवसेना संपविण्यासाठी, शिवसेना फोडण्यासाठी जे लोक काम करीत आहेत, अशा लोकांना प्रत्येक निवडणुकीत आम्ही कसे व का सहकार्य करावे, ज्या शिवसैनिकाला मतदारसंघातील प्रश्न, समस्या माहीत आहेत. जो मतदारसंघातील आहे, अशाच नेत्याला केज विधानसभा मतदारसंघाचे समन्वयक म्हणून जबाबदारी सोपविण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेचे (शिंदे गट) उपजिल्हाप्रमुख गजानन मुडेगावकर, शहरप्रमुख ऋषिकेश लोमटे व दादासाहेब देशमुख यांनी केली. ते अंबाजोगाईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
शहरातील शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, प्रशांतनगर येथे शिवसेना (शिंदे गट) यांच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद आयोजित केली होती. या पत्रकार परिषदेत बोलताना शहरप्रमुख ऋषिकेश लोमटे यांनी सांगितले की, अंबाजोगाई शहर व तालुक्यात शिवसेनेचे पाच हजारांहून अधिक सक्रिय सभासद आहेत. मराठी माणूस मोठा झाला पाहिजे, शिवसेना तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी निवडणूक लढवायची आहे. शिवसेनेकडे वैजनाथ वाघमारे, रामहरी राऊत व लहू बनसोडे हे इच्छुक उमेदवार आहेत. ‘महायुती’ म्हणून आम्ही काम करणार आहोत. पण, शिवसेना संपविण्याचे षडयंत्र कोणी करू नये. अन्यथा आम्हाला आमची ताकद दाखवून द्यावी लागेल, असा इशारा शहरप्रमुख ऋषिकेश लोमटे यांनी दिला. त्यासोबतच आम्ही समन्वयक म्हणून दादासाहेब देशमुख यांचे नांव सुचवित आहोत, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी शिवसेनेचे (शिंदे गट) उपजिल्हाप्रमुख गजानन मुडेगावकर म्हणाले की, मुख्यमंत्री शिंदे यांच्यासाठी आम्ही ‘महायुती’ चे काम करू, ज्या शिवसैनिकाला मतदारसंघातील प्रश्न, समस्या माहीत आहेत. त्यांनाच समन्वयक पदाची जबाबदारी द्यावी, असेही मुडेगावकर म्हणाले.
शिवसेनेकडून विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेले लहू बनसोडे यांनी सांगितले की, मागील 30 वर्षांपासून केज राखीव मतदारसंघात फक्त एकाच कुटुंबाची सत्ता कायम आहे. त्यामुळे मतदारसंघात विकासाचे प्रश्न, समस्या सुटू शकल्या नाहीत. कोणत्याही तरूणाला रोजगार उपलब्ध झाला नाही. केज मतदार संघातील सर्वसामान्य माणूस व बहुजन समाज विकासापासून कोसो दूर आहे. त्यामुळे मतदारांनी शिवसेनेला एकदा आशिर्वाद व संधी द्यावी, आम्ही संधीचे सोने करू, जनतेच्या प्रश्नांची सोडवणूक करू, असे बनसोडे यांनी सांगितले. यावेळी दादासाहेब देशमुख यांनीही मनोगत व्यक्त केले. पत्रकार परिषदेत उपस्थितांचे आभार दत्ता देवकर यांनी मानले. या पत्रकार परिषदेला शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.