पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अधिकृत उमेदवारी केली जाहीर
टीम AM : राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली असून सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे. राज्यातील प्रत्येक विधानसभा मतदार संघाची चाचपणी केली जात असून प्रत्येक राजकीय पक्ष तगडा उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. केज विधानसभा निवडणुकीतही यंदा तगडी लढत पाहायला मिळणार आहे. त्यासाठी ‘महाविकास आघाडी’ आणि परिवर्तन महाशक्ती तिसरी आघाडीची उमेदवारी कोणाला मिळणार याकडे मतदार संघातील जनतेचे लक्ष लागले आहे. दुसरीकडे ‘महायुती’ च्या वतीने भाजपच्या विद्यमान आमदार नमिता मुंदडा यांची उमेदवारी जाहीर झाली असून त्यांच्या विरोधात महाविकास आघाडी कोणाला उमेदवारी देणार ? याचीच चर्चा सर्वत्र दिसून येत आहे. केज विधानसभा मतदारसंघाची जागा ही महाविकास आघाडीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे.
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचेही जवळपास 45 उमेदवार निश्चित झाल्याची माहिती मिळाली आहे. या उमेदवारांच्या नावांची अधिकृत घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. केज विधानसभा मतदारसंघात माजी आमदार पृथ्वीराज साठे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. माजी आमदार पृथ्वीराज साठे यांच्या उमेदवारीचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात येत आहे.
फॉर्म भरण्यासाठी तयारी करण्याचे आदेश
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या उमेदवारांची यादी समोर आली आहे. यात केज विधानसभा मतदारसंघात माजी आमदार पृथ्वीराज साठे यांना उमेदवारी देण्यात आली असून त्यांना निवडणूकीचा फॉर्म भरण्यासाठी तयारी करण्याचे आदेश पक्षाकडून देण्यात आले आहेत, अशी माहिती अधिकृत सूत्रांकडून मिळाली आहे.
फेसबुकवर मानले आभार
केज विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिल्याबद्दल पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खा. सुप्रिया सुळे, खा. बजरंग सोनवणे यांचे माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनी आभार मानले आहेत.