विधानसभा निवडणूक : प्रशासन सज्ज, 50 टक्के मतदान केंद्रावर ‘वेब कास्टिंग’, वाचा…

टीम AM : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीड जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जिल्ह्यातील 50 टक्के मतदान केंद्रावर ‘वेब कास्टिंग’ केली जाणार असून मतदारांनी शंभर टक्के मतदान करावं, असं आवाहन पाठक यांनी यावेळी केलं.

संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रावर पोलिसांचा विशेष बंदोबस्त असणार आहे. गेवराई, माजलगाव, बीड, आष्टी, केज आणि परळी येथील 96 मतदान केंद्र संवेदनशील असून या मतदान केंद्रावर ‘सीसीटीव्ही’ च्या माध्यमातून जिल्हा प्रशासनातर्फे लक्ष ठेवले जाणार असल्याचं पाठक यांनी सांगितलं आहे. 

आचारसंहितेची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात यावी

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 साठी भारत निवडणूक आयोगातर्फे राज्यात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यातील सहाही मतदारसंघात आचारसंहितेची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात यावी, अशा सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.