टीम AM : विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने 105 उमेदवारांची यादी तयार केली आहे. भाजप आज पहिली यादी जाहीर करणार असल्याची माहिती आहे. भाजपच्या पहिल्या यादीत विद्यमान आमदार आणि काही नवीन चेहरे सुध्दा दिसणार आहेत. भाजपच्या पहिल्या यादीत अनेक विद्यमान आमदारांचा पत्ता कट होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
भाजपने यावेळी विद्यमान आमदारांचा पत्ता कट करून नवीन चेहऱ्यांना संधी देण्याची तयारी दर्शविली आहे. पहिल्या टप्प्यात विद्यमान आणि नवीन चेहऱ्यामध्ये मुंबई, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि कोकणमधील काही उमेदवारांचा समावेश असणार आहे.
भाजपकडून जवळपास 18 ते 20 आमदारांचा पत्ता कट होणार असल्याची माहिती समोर येत आहे. पक्षात सक्रिय नसणे, मतदार संघात काम न करणे, जनतेशी संपर्क न ठेवणे, मतदारसंघात विरोधात वातावरण असणे या सारख्या निकषांच्या आधारावर भाजप विद्यमान आमदारांचा पत्ता कट करणार आहे. भाजपच्या पहिल्या यादीसाठी संसदीय समितीची बैठक पार पडली असून 105 उमेदवार निश्चित केले आहेत. आज 105 उमेदवारांची पहिली यादी भाजप जाहीर करणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.