टीम AM : नुसरत फतेह अली खान यांचा आज जन्मदिन. त्यांचा जन्म 13 ऑक्टोबर 1948 रोजी पाकिस्तानमधील पंजाबच्या लायलपूर येथे झाला. 1947 साली भारत व पाकिस्तानात फाळणी झाली आणि अनेक मुस्लिम कलाकार पाकिस्तानात गेले. त्यात फतेह अली खान यांचे कुटुंबीय सुद्धा होते. त्यांनी जालंधर सोडून फैसलाबाद गाठल्यानंतर 1948 मध्ये नुसरत फतेह अली खान यांचा जन्म झाला.
आपल्या घराण्याच्या 600 वर्षांच्या कव्वाली गायनाची परंपरा फतेह अली खान यांनी परमोच्च पातळीवर नेऊन ठेवली. वास्तविक पाहता त्यांच्या अब्बाजानना वाटत होते की, चार मुलींनंतर जन्मलेल्या आपल्या मुलाने या गायकी वगैरेच्या नादी न लागता चांगलं डॉक्टर, इंजिनीअर वगैरे बनावं. पण नुसरत फतेह अली खान यांच्या रूपाने जगाला एक महान गायक मिळाला. ते गायक तर होतेच, सोबत त्यांनी अत्युत्तम दर्जाची गाणी सुद्धा लिहिली आणि ते अफाट प्रतिभेचे संगीतकार सुद्धा होते. त्यांनी संगीताच्या क्षेत्रात केलेली मुशाफिरी पाहून दंग व्हायला होतं.
कव्वाली, गझल, सुफी, क्लासिकल आणि लोकसंगीत हे सर्व प्रकार त्यांनी लीलया हाताळलेच, पण जागतिक संगीतात सुद्धा भरीव योगदान दिलं. वेस्टर्न म्युझिक असो वा एशियन, जपानी युरोपिअन असो वा पाकी – पॉप इंडी – पॉप. नुसरत फतेह अली खान यांचे जागतिक पातळीवर एकूण 128 अल्बम निघाले आहेत. हा एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे, याची नोंद ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ मध्ये झाली आहे. आपल्या दमदार आवाजात सलग दिवस आणि रात्र न थांबता ते गाऊ शकत असत, इतका जबरदस्त त्यांचा स्टॅमिना होता.
‘मेरा पिया घर आया’ ‘पिया रे पिया रे तेरे बिना लागे नाही म्हारा जिया रे’, ‘सानू एक पल चैन न आवे सजना तेरे बिना’, ‘सांसो की माला पे’, ‘अंखीया उडीत दिना’, ‘ये जो हलका हलका सुरुर है’, ‘आफरिन आफरिन’, ‘हक अली अली’ अशी अनेक गाणी त्यांची गाजली आहेत. शिकागो येथे 1993 साली झालेल्या रॉक कॉन्सर्ट मध्ये नुसरत यांनी गाण्यास सुरुवात केली आणि अमेरिकेतील नागरिकही त्यांच्या आवाजावर फिदा झाले. नुसरत यांची परंपरा त्यांचा पुतण्या राहत फतेह अली खान सध्या चालवतोय. नुसरत फतेह अली खान यांना केवळ 49 वर्षांचेच आयुष्य लाभले. नुसरत फतेह अली खान यांचे 16 ऑगस्ट 1997 रोजी निधन झाले. त्यांना भावपूर्ण आदरांजली.
शब्दांकन : संजीव वेलणकर