राजकीय, सामाजिक आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी केले अभिवादन
टीम AM : अंबाजोगाई शहरातील मोरेवाडी परिसरातील छत्रपती संभाजी महाराज चौकात विजयादशमीच्या मुहूर्तावर छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसविण्यात आला आहे. रातोरात बसविण्यात आलेला हा पुतळा पाहून सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दरम्यान, पुतळा बसविण्यात आल्याची माहिती वाऱ्यासारखी सोशल मीडियावर पसरली आणि छत्रपती संभाजी महाराज चौकात पुतळा पहाण्यासाठी एकच गर्दी होऊ लागली. आज सकाळपासूनचं छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी अनेकांनी हजेरी लावली. पुतळ्याला पुष्पहार अर्पण करीत राजकीय, सामाजिक आणि विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी अभिवादन केले.
अंबाजोगाई शहरातील मध्यवर्ती ठिकाणी सर्वच महापुरुषांचे चौक आहेत. पण त्या ठिकाणी महापुरुषांचे पुतळे बसविण्यात आले नाहीत. त्यामुळे अनेकजण अंबाजोगाईला बिन पुतळ्याचे गाव म्हणूनही ओळखायचे. अंबाजोगाईत पुतळे का बसविले नाही ? हा संशोधनाचा विषय असला तरी शहरात काही ठिकाणी महापुरुषांचे पुतळे अस्तित्वात आहेत. चनई रोडवरील संघर्षभूमी येथे तथागत गौतम बुद्धांचा आणि महात्मा फुले यांचा अर्धाकृती पुतळा बसविण्यात आला आहे. त्यासोबतच स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात डॉ. व्यंकटराव डावळे यांचाही अर्धाकृती पुतळा आहे. मध्यंतरी योगेश्वरी शिक्षण संस्थेच्या आवारात महात्मा फुले यांचा अर्धाकृती पुतळा बसविण्यात आला आहे. तसेच याच ठिकाणी स्वामी रामानंद तीर्थ यांचाही पुतळा आहे. जयंतीदिनी अभिवादन करण्यासाठी अंबाजोगाईकर सातत्याने या ठिकाणी हजेरी लावत असतात.
अंबाजोगाई शहरातील महापुरुषांच्या चौकात महापुरुषांचे पुतळे बसविण्यात यावेत, अशी मागणी गेल्या कित्येक वर्षांपासून केली जात आहे. पण या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यामुळे महापुरुषांच्या चौकाचे सुशोभीकरण करण्यासाठी अनुयायांना ‘डिजिटल फ्रेम’ चार आधार घ्यावा लागत आहे. पण विजयादशमीच्या दिवशी अंबाजोगाई शहरातील मोरेवाडी परिसरातील छत्रपती संभाजी महाराज चौकात रातोरात छत्रपती संभाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा बसविण्यात आला आहे. ही बातमी सकाळी सोशल मीडियाद्वारे वाऱ्यासारखी पसरली आणि पुतळा पहाण्यासाठी चौकात एकच गर्दी झाली. आज सकाळपासूनचं संभाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येत आहे. राजकीय, सामाजिक आणि विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले आहे.
महापुरुषांचे पुतळे बसविण्यासाठी पुढाकार
अंबाजोगाई शहरातील मध्यवर्ती ठिकाणी महापुरुषांचे चौक आहेत. या चौकात येणाऱ्या काळात महापुरुषांचे पुतळे बसविण्यात येतील. त्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे आणि पुढाकार घेणार असल्याचे विविध राजकीय पक्षांच्या आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी सोशल मीडियावर जाहीर केले आहे. त्यामुळे अंबाजोगाई शहरात महापुरुषांचे पुतळे बसविण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.