अभिनेते सयाजी शिंदेंच्या हाती घड्याळ : ‘स्टार प्रचारक’ म्हणून नियुक्ती

टीम AM : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच पक्षांचे नेते जोरदार कामाला लागले आहेत. अनेक नेत्यांकडून मतदारसंघात मोर्चेबांधणी सुरु असून सभा, मेळावे घेण्यात येत आहेत. यातच ऐन निवडणुकीच्या तोंडावर अनेक नेते, एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करत असल्याचंही पाहायला मिळत आहे. असे असतानाच आता अभिनेते सयाजी शिंदे यांनी आज (11 ऑक्टोबर) राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात प्रवेश केला आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज मुंबईत पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत अभिनेते सयाजी शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला. अभिनेते सयाजी शिंदे हे आता पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून काम करणार आहेत.

अभिनेते सयाजी शिंदे यांनी हिंदी, मराठी, तेलगू आणि तमिळ चित्रपटांमध्ये काम केलेलं आहे. तसेच ते गेल्या काही वर्षांपासून सामाजिक क्षेत्रातही कार्यरत आहेत. सयाजी शिंदे यांनी लाखो झाडे लावत सह्याद्री देवराई उभे केलेलं आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याची राज्यभरात चर्चाही झाली. मात्र, सामाजिक कार्यानंतर आता सयाजी शिंदे यांनी राजकारणात प्रवेश करत अजित पवारांच्या उपस्थितीत घड्याळ हाती बांधलं आहे.