टीम AM : ग्रामीण भागातील रुग्णांची तपासणी केल्यानंतर पुढील उपचारासाठी काही मोठ्या किंवा दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया करण्याची गरज भासते. मात्र, ग्रामीण भागातील रुग्णांना अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी बाहेरगावी जावे लागत असल्याने त्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. आता बीड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रुग्णांना मोठ्या असोत किंवा दुर्बिणीद्वारे करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रिया असोत, आपल्या अगदी जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये करता येणार आहेत आणि त्यासाठी संपूर्णतः नियोजन केले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी दिली आहे.
बीड जिल्ह्यातील रुग्णांना आपल्या जवळच्या रुग्णालयामध्ये अशा प्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यात याव्यात, यासाठी जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय किंवा ग्रामीण रुग्णालय असतील त्या ठिकाणी कोणत्या वारी मोठ्या शस्त्रक्रिया आणि कोणत्या दिवशी दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया केल्या जातील, याचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये पहिल्या व तिसऱ्या मंगळवारी मोठ्या शस्त्रक्रिया उपजिल्हा रुग्णालय गेवराई आणि ग्रामीण रुग्णालय माजलगाव या ठिकाणी करण्यात येतील तर दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया ग्रामीण रुग्णालय तालखेड आणि तेलगाव या ठिकाणी करण्यात येतील. तसेच दुसऱ्या व चौथ्या मंगळवारी मोठ्या शस्त्रक्रिया उपजिल्हा रुग्णालय केज आणि ग्रामीण रुग्णालय धारूर येथे करण्यात येतील तर दुर्बिणीद्वारे करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रिया ग्रामीण रुग्णालय नांदूर घाट आणि चिंचवड या ठिकाणी करण्यात येतील. त्याचबरोबर पहिल्या व तिसऱ्या शुक्रवारी मोठ्या शस्त्रक्रिया ग्रामीण रुग्णालय पाटोदा आणि आष्टी तर दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया ग्रामीण रुग्णालय रायमोहा येथे करण्यात येणार आहेत. तर दुसऱ्या व चौथ्या शुक्रवारी मोठ्या शस्त्रक्रिया लोखंडी सावरगाव उपजिल्हा रुग्णालय, परळी वैजनाथ येथील उपजिल्हा रुग्णालयात तर नेकनूर येथील स्त्री रुग्णालयात करण्यात येतील आणि दुर्बिणीद्वारे करण्यात येणाऱ्या शस्त्रक्रिया त्याच दिवशी ग्रामीण रुग्णालय धानोरा बुद्रुक येथे करण्यात येतील.
महिन्यातील प्रत्येक नमूद केलेल्या दिवशी रुग्णालयात तपासणी करून शस्त्रक्रियेसाठी तयार असलेल्या रुग्णांना संबंधित दिवशी त्या – त्या आरोग्य केंद्रात येण्याबाबत सूचित करावे. आपल्या रुग्णालयात शस्त्रक्रिया होत आहेत हे येणाऱ्या रुग्णांना माहिती व्हावी, यासाठी दर्शनी भागावर सूचना लावावी, जेणेकरून जास्तीत जास्त रुग्णांना याचा लाभ होईल, अशी सूचना जिल्ह्यातील वैद्यकीय अधीक्षकांना डॉ. अशोक थोरात यांनी दिली आहे. तसेच जिल्ह्यातील रुग्णांनी आता शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी बाहेरगावी जाण्याची गरज नसून आपल्या जवळच्या रुग्णालयात शस्त्रक्रिया करून घ्याव्यात, असे आवाहनही डॉ. थोरात यांनी केले आहे.